
रोहा नगर परिषदेने नागरिकांवर ५५ टक्के पाणी करवाढ लादली होती. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या अन्यायकारक आणि अवाजवी पाणीपट्टी वाढीविरोधात आवाज उठवत उपोषणाचे हत्यार उपसले होते. शिवसेनेच्या आंदोलनामुळे नगर परिषद प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून पाणी करवाढीला ब्रेक लागला आहे. यासंदर्भात शनिवारी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शिवसेनेमुळे रोहेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रोहा नगर परिषदेने अचानकपणे ५५ टक्के पाणीपट्टी वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. या अन्यायकारक भाववाढीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख राजेश काफरे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागाने उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले होते. या उपोषणाला रोहेकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. नागरिकांच्या वाढत्या दबावामुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले. शनिवारी या विषयावर तातडीने बैठक बोलावण्यात आली.
या बैठकीला राज्याच्या मंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, तालुकाप्रमुख नितीन वारंगे, उपतालुकाप्रमुख सचिन फुलारे, शहरप्रमुख राजेश काफरे, विजय देसाई आदी उपस्थित होते. पाणी दरवाढीविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन मंत्री आदिती तटकरे यांनी पुढील चार ते पाच दिवसांत प्रशासनासोबत कायदेशीर आणि तांत्रिक बाबी पडताळून रोहेकरांना दिलासा देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यानंतर शिवसेनेने उपोषण स्थगित केले.
जनतेच्या खिशावर दरोडा नको
प्रशासनाने खर्च वाढल्याचे कारण पुढे करत ही भाववाढ अपरिहार्य असल्याचा दावा केला. मात्र प्रसाद भोईर यांनी हा दावा खोडून काढला. खर्च वाढला असेल तरीही एकाच वेळी ५५ टक्के भाववाढ करणे कोणत्याही नियमात बसत नाही. हा सर्वसामान्य नागरिकांवर सरळ सरळ अन्याय आहे. केवळ खर्च वाढल्याचे कारण देऊन जनतेच्या खिशावर दरोडा टाकता येणार नाही, अशा कडक शब्दांत जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी प्रशासनाला सुनावले.





























































