
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नव्याने नियुक्त झालेल्या पृथ्वीराज घोरपडे यांची खुर्चीवर बसण्याआधीच तासाभरात पुन्हा बदली करण्यात आली आहे. क्रिमपोस्ट म्हणून ओळख असलेल्या या पोलीस ठाण्यात अन्य कुणाची वर्णी लावण्यासाठी हा बदलीचा खेळ खेळण्यात आला का, यासाठी पोलीस आयुक्तांवर नेमका कुणाचा दबाव आहे, असे एक ना अनेक सवाल उरणमध्ये विचारले जात आहेत.
उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी ११ महिन्यांपूर्वी हनिफ मुलाणी यांची क्राइम ब्रँचमधून नियुक्ती झाली होती. मुलाणी यांना मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी बढती मिळाल्याने त्यांच्या जागी नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून याआधी गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पृथ्वीराज घोरपडे यांची नियुक्ती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशाने झाली होती.
सोमवारी मुलाणी यांनी पुष्पगुच्छ देऊन पदांची सुत्रे पृथ्वीराज घोरपडे यांच्याकडे सुपूर्दही केली. दोघांनीही पुढील वाटचालीसाठी परस्परांना शुभेच्छा दिल्या. मात्र खुर्चीवर बसण्याआधीच अवघ्या तासाभरात त्यांची उचलबांगडी करत घोरपडे यांची परवाना शाखेत बदली करण्यात आली.
१४ वर्षांत १३ जणांना ‘बसवले’
उरण पोलीस ठाण्यात मागील १४ वर्षांत एकूण १३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी काम केले आहे. मात्र त्यापैकी फक्त सुदाम औटी, राजेंद्र गलांडे, राजेंद्र आव्हाड, जगदीश कुलकर्णी, रवींद्र बुधवंत या पाच अधिकाऱ्यांनीच वपोनि पदाचा दोन वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण केला आहे. उर्वरित बहुतांश अधिकाऱ्यांना मुदतीपूर्वीच ‘उचलण्यात’ आले आहे.





























































