
व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने आई- वडिलांना पैशासाठी शिवीगाळ, धमक्या दिली. त्यांना मारहाण करण्यापर्यंत त्याची मजल गेली. मुलाकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून आईने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आईची व्यथा ग्राह्य धरत आई वडिलांचे मुलापासून संरक्षण करण्याचे अंतरिम आदेश पोलिसांना दिले आहेत.
वारजे परिसरात राहणाऱ्या रोम (वय ५८) आणि रोमा (वय ५३) या दाम्पत्याला सोमा (वय २८) मुलगा (तिघांची नावे बदलेली आहेत) आहे. आरोग्याच्या समस्यांमुळे रोमा यांनी स्वेछानिवृती घेतली होती, तर रोम हे वर्कशॉपमध्ये काम करतात. मुलाने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
शिक्षण पूर्ण केल्यानंतरही तो व्यवसाय अथवा काम करत नव्हता. व्यसनाच्या आहारी गेल्याने तो दररोज आई-वडिलांकडे पैशांची मागणी करत होता. पैसे न दिल्यास तो त्यांना शिवीगाळ, मारहाण आणि धमक्या देत होता. मुलाच्या भीतीपोटी दोघेही पती-पत्नी अनेकदा दिवसांचा वेळ मंदिर, उद्यान आणि रस्त्यावर काढायचे.
मुलाने मोबाईलमधील ओटीपीचा वापर करून त्यांच्या नावावर ऑनलाइन अॅपद्वारे कर्ज काढल्याचे उघडकीस आल्यानंतर आईने अॅड. कमलेश दिवेकर यांच्यामार्फत मुलाविरोधात दावा दाखल करत मुलापासून संरक्षण मिळण्याची मागणी केली, असे अॅड. दिवेकर यांनी सांगितले.



























































