दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; राजस्थानमध्ये बस-ट्रकच्या धडकेत 7 प्रवाशांचा मृत्यू, 15 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर बुधवारी पहाटे एक भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. उत्तराखंडमधील ऋषिकेश येथून मध्य प्रदेशातील इंदूरकडे जाणाऱ्या एका खासगी प्रवासी बसने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनवाडा गावाजवळ झाला. धडक इतकी भीषण होती की, धडक बसताच दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या भीषण दुर्घटनेत सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

दौसाचे पोलीस अधीक्षक पियुष दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीत पाच प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर इतर दोन प्रवाशांनी डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान दम तोडला. ही बस इंदूर येथील ‘हंस ट्रॅव्हल्स’ या कंपनीची होती. पहाटेच्या सुमारास झालेल्या या धडकेमुळे आणि त्यानंतर लागलेल्या अचानक आगीमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली आणि एकच पळापळ सुरू झाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशामक दल आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अग्निशामक दलाने अथक प्रयत्नांनंतर दोन्ही वाहनांना लागलेली आग आोटोक्यात आणली. अपघातातील सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलीस आणि स्थानिक प्रशासन या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.