
शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या बळावर उभी आहे. गेल्या काही काळामध्ये शिवसेना धक्काप्रूफ झालेली आहे. आता अशा जाण्याने आम्हाला धक्के बसत नाहीत आणि आम्ही बसूनही घेत नाही, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत बुधवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले. सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत ते बोलत होते.
सचिन अहिर हे शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. काल आपण आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य ऐकले असेल. सचिन अहिर हे सांगू शकत नाहीत की मला कुणी भेटत नव्हते, माझे कुणी ऐकत नव्हते. आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सचिन अहिर यांना रोजच भेटत होते. मी असे ऐकले की त्यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांना संदेश पाठवले की, माझ्या पुढच्या वाटचालीसाठी, भवितव्यासाठी पक्ष सोडणे ही माझी अपरिहार्यता आहे. मग कार्यकर्ता म्हणून कुणी काम करायचे? शरद पवार यांनाही त्यांनी याच पद्धतीने पुढल्या करियरसाठी सोडले, असे संजय राऊत म्हणाले.
शरद पवारांनी सचिन अहिर यांना मातीतून उचलून धुळीतून शिखरावर नेले होते. त्या काळात सचिन अहिर यांना मंत्री करणे हे फार मोठे साहस होते. त्यांना म्हाडाचे प्रमुख केले, अनेक वर्षे मंत्री केले, एनसीपीचे मुंबई अध्यक्ष केले आणि अचानक ते शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला बेसावध ठेवून शिवसेनेमध्ये आले. त्यामुळे आम्ही असे म्हणतो की, ते शरद पवारांचेही झाले नाहीत, त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील हा माझ्या मनात कायम प्रश्न आहे. तरीही त्यांचे आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. हे मूळ शिवसैनिक कुणी नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. काल सुनील शिंदे बोलले ते बरोबर आहे. आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. पक्ष हा मूळ शिवसैनिकच वाढवत असतो, बाकी सगळे वाऱ्यावरची वरात असते, असेही राऊत म्हणाले.
सचिन अहिर असे म्हणतात की राजकीय भविष्यासाठी मी आलो. खरे म्हणजे त्यांचा पराभव सुनील शिंदे यांनी केला, तेव्हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम लागला होता. सुनील शिंदे यांच्यासमोर टिकणे त्यांना शक्य नव्हते. आदित्य ठाकरे दोन वेळा आमदार झाले. या काळामध्ये त्यांचे राजकीय भविष्य घडवण्याचे काम आदित्य ठाकरे यांनी केले. त्यांना विधान परिषदेमध्ये आमदार केले. त्यांना उपनेता केला. भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष केले. अख्खा पुणे जिल्हा त्यांच्या ताब्यात दिला. अजून एखाद्याला काय द्यायला पाहिजे की जो समाधानी राहील. समाधानी राहणे हे फार मोठे संस्कार आणि कला आहे. इतके मिळाल्यावरही त्यांना वाटते माझे करियर झाले नाही किंवा माझ्या करियरमध्ये अडथळे येत आहेत. ठाकरे कुटुंबाने, शिवसैनिकांनी तुमच्यावरती इतके प्रेम केले. त्यांना अंधारत ठेवून झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेलात. याला इमान म्हणत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
आता सचिन अहिर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. त्यांना उपसभापतीपद दिले. कुठेतरी उमेदवारीही देतील. एखाद्या पदाशिवाय जर एखादा कार्यकर्ता किंवा नेता राहू शकत नसेल तर ती लालच तुमच्या राजकीय कारकिर्दीची अंत करू शकते. सचिन अहिर गेल्यामुळे आम्हाला वाईट जरूर वाटले. त्यांनी असे करायला नको होते, कारण त्यांना सर्व काही मिळाले होते. सर्व काही दिले होते. मान, सन्मान, प्रतिष्ठा, पद हे सगळे दिल्यावर एखादा माणूस जात असेल आणि त्याला फोडल्याबद्दल एकनाथ शिंदे रावणाप्रमाणे विकाट हास्य करत होते. आज तुमच्या हातामध्ये पाशवी सत्ता आहे, पैसा आहे आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून तुम्ही हे करू शकता. तुम्ही असे कार्यकर्ते फोडून दाखवा ज्यांना काहीच नकोय. ज्यांना पदाचा, प्रतिष्ठेचा, पैशाचा कोणताही मोह नाही. मग आम्हाला अशा प्रकारे हसून दाखवा. या राज्याचे वैचारिक अध:पतन सुरू झाले आहे आणि त्याचा काळाकुट्ट इतिहास लिहिला जाईल तेव्हा अनेक पानं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेवर लिहिली जातील, असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले, फुटलेल्या सहा खासदारांपैकी पाच काँग्रेसमधून आले होते. पक्षाबरोबर राहणारे कार्यकर्ते फार दुर्मिळ असतात. सचिन अहिर यांच्या सारख्यांना सर्व काही मिळाले, जे खासदार फुटून गेले त्यांना सर्व काही मिळाले. इतकेच कशाला एकनाथ शिंदे यांना या पक्षातील सर्वोच्च पदं दिली. त्यांच्या मुलाची डॉक्टरकी संशयास्पद असून ती चालेल, नाही चालेल म्हणून उद्धव ठाकरे यांनी करियर म्हणून त्यांना खासदार केले. आता तो आम्हाला अक्कल शिकवतोय. त्यांच्याबरोबर गेलेला प्रत्येक जण हा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे लाभार्थी आहेत. सगळे लाभार्थी जात आहेत. एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी एकापाठोपाठ एक अशी पदं दिली नसती तर कसले कर्तृत्व आणि कर्तबगारी. नगरसेवकच राहिले असते ना ते, असेही राऊत म्हणाले.
शिवसेनेत आल्यावर सचिन अहिर यांनी किती दगड मारले. आधी काय चाकू, सुरे फिरवले ते माहिती नाही. पण शिवसेनेमध्ये येऊन किती दगड मारले? शरद पवारांनी काय दगड मारले होते? एकनाथ शिंदे यांनी किती दगड मारले? ते म्हणतात मी बेळगावच्या आंदोलनात गेलो. मी काय बोलतो, मग दाखवा कुठे होतात ते. दगड मारणारा प्रत्येक कार्यकर्ता आजही मूळ पक्षामध्येच आहे. तुमच्याबरोबर गेले ते आर्थिक लाभासाठी गेले. इथे ज्यांनी लाभ मिळवला, ते तिकडले लाभार्थी झाले. हे लाभार्थी इकडून तिकडे जाताहेत. उद्या इथे लाभ मिळाल्यावर ते परत आमच्या दारात उभे राहतील, असेही संजय राऊत म्हणाले.





























































