
दापोलीतील वाहतूक नियमांची सातत्याने होणारी पायमल्ली आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला निर्माण होणारा धोका याविरोधात पत्रकार व विधी सेवा समिती सदस्य मनोज पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. त्यांच्या लेखी तक्रारीची गंभीर दखल घेत दापोली पोलिसांनी संबंधित 17 वाहनचालकावर मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई केल्याचे अधिकृत पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
दापोली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी पत्रकार व विधी सेवा समिती सदस्य मनोज पवार यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, त्यांनी 26 जून 2026 रोजी केलेल्या तक्रार अर्जाची पडताळणी करण्यात आली. तक्रारीतील बाबींची खातरजमा केल्यानंतर संबंधित 17 वाहनचालकावर महाराष्ट्र मोटार वाहन कायद्याच्या कलम 177 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल रुपये 8500 चा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच यापुढेही अशा प्रकारच्या नियमभंगाविरुद्ध आवश्यक ती कारवाई सुरूच राहील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. ही कारवाई वाहनांवर अतिरिक्त हेडलाईट लावणाऱ्यांवर करण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे, अनेकदा नागरिक नियमांचे उल्लंघन पाहूनही तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे अनेक प्रकरणे दुर्लक्षित राहतात. मात्र यावेळी पत्रकाराने स्वतः पुढाकार घेत पुराव्यासह तक्रार दाखल केली आणि प्रशासनालाही कारवाई करण्यास भाग पाडले. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून तक्रार केल्यास त्याची योग्य दखल घेतली जाते, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. दापोली तालुक्यात रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. किरकोळ निष्काळजीपणामुळे अनेकदा मोठे अपघात घडतात आणि निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणे ही काळाची गरज बनली आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवल्यास नियमभंग करणाऱ्यांवर निश्चितच वचक निर्माण होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, दापोली पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास तिची कायदेशीर पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे संकेत या प्रकरणातून मिळाले आहेत.































































