आंजर्लेच्या आयशा काझी यांची भरारी, IRS अधिकारी प्रशिक्षणार्थीचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यातील आंजर्ले गावच्या सुपुत्र आयशा इब्राहिम काझी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश संपादन करत भारतीय महसूल सेवा (Indian Revenue Service – IRS) मध्ये अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून स्थान मिळवले असून, नुकतीच त्यांची देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी राष्ट्रपती भवनात भेट झाली. या प्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

मूळच्या आंजर्ले (जुईकर मोहल्ला) येथील असलेल्या आयशा काझी सध्या ठाणे जिल्ह्यातील काळवा-मुंब्रा येथे वास्तव्यास आहेत. 2023 च्या UPSC परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत त्यांनी हिंदुस्थानच्या  महसूल सेवेत प्रवेश मिळवला. सध्या त्या अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रपती भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रतिष्ठित प्रतिनिधीमंडळाचा भाग म्हणून आयशा काझी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेला त्यांचा सन्मान हा कोकणासाठी अभिमानाचा क्षण ठरला.

सामान्य कुटुंबातून कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर केंद्रीय सेवेत स्थान मिळवणाऱ्या आयशा काझी यांनी कोकणातील तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या यशामुळे आंजर्ले गावासह संपूर्ण दापोली तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयशा काझी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत.