
शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभव परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गद्दार आणि भाजपवर निशाणा साधला. जे अयोध्या लुटत आहेत, उज्जैनची भूमी लुटत आहेत, तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसू शकता? या प्रश्नाचे गद्दारांनी जनतेला उत्तर द्यावे, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी गद्दारांना दिले. तसेच सरकारमधील भ्रष्टाचार आणि फोडाफोडीचे राजकरण यावरही त्यांनी परखडपणे मत व्यक्त केले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिंधेंच्या पक्षामध्ये जे खूप इच्छुक होते आता त्याच्यात कॅटेगरी झाल्या आहेत. जुनियर गद्दार कोण? सीनियर गद्दार कोण? सुपरियर गद्दार कोण? आता मिंधेंच्या टोळीमध्ये जे कोणी पळून गेले होते, ते आता विचारतात आम्हाला कधी काय मिळणार? हे सगळे जरी होत असेल तरी अनेक या राज्यांमध्ये भाजपचे कार्यकर्ते आहेत, संघाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी पूर्ण जीवन भाजपला समर्पित करून टाकलं होतं. घरदार सोडून प्रचार करणं असेल, त्यांच्यासाठी निवडणुकीत काम करणं असेल, ते लोक भाजपची एवढी सत्ता असताना या पदांवर कधी बसणार? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
निवडणूक आयोग असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल त्यांच्याबाबत पूर्ण आदर ठेवून आम्ही हेच सांगत आहोत की, जे आमच्या सोबत झालं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत झालं, आम आदमी पार्टीसोबत झालं, टीएमसीसोबत झालेलं आहे आणि इतर पक्षांसोबत होऊ शकतं. पण हे जे काही चिंधडे उडालेले आहेत लोकशाहीचे त्याच्यासाठी जबाबदार कोण आहे? याच्यात जर न्याय निवाडा झाला असता, आम्ही जो आम्ही न्याय मागत होतो, तो आधीच मिळाला असता तर आज देशाची ही स्थिती झाली नसती. आता 30 तारखेला तारीख आहे पण वेळ मिळेल का आणि न्याय मिळेल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
राज्यात जे ऑपरेशन देवेंद्र चालू आहे, ते महाराष्ट्रालाच काय देशाला खूप धोकादायक आहे. जी काही एक राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे, ती धोकादायक आहे. राज्यामध्ये चाललंय पक्षांची तोडफोड असेल, पैसे देऊन आमदार विकत घेणं असेल, निर्लज्जपणे या आज बॅनरवर उद्या त्या बॅनरवर, माझ्यासोबत की तुमच्यासोबत, हा जो काही निर्लज्जपणा चाललाय, ही जी काही चोरी चालली आहे, ते धोकादायक आहे. किती राजकारण करायचं काय त्याला पातळी आहे की नाही? किती खालती जायचा त्याला काही पातळी आहे की नाही? हे सगळं होत असताना देशाची आर्थिक स्थिती काय आहे? राज्याची आर्थिक स्थिती काय आहे? नोकऱ्या आहेत का? तुमचं जीवनमान सुधारले का? त्याच्यावर कुठेही सरकार म्हणून शासन म्हणून लक्ष नाही. कालच जी घटना घडलेली आहे एका 11 वर्षाचा मुलाचा जीव गेलेला आहे. पण कुठेही काही चर्चा नाही नुसत हंगामा करायचा. आमदार विकत घ्यायचे पक्ष फोडायचे हे घाणेरडे राजकारण मिंधेंच्या टोळीनी असेल किंवा भाजपने सुरू केले आहे. याच्यावर आपल्याला विचार करण्याची वेळ आलीय, असे त्यांनी सांगितले.
त्यांची कितीही फोडाफोडी, खासदार, आमदार विकत घेणे सुरू आहे. मात्र, जी जनता आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर विश्वास ठेवते. आमचा आमच्या कामावर विश्वास आहे, आमचा आमच्या पक्षावर विश्वास आहे आणि जनतेवर विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
हे सगळं होत असताना जे आमदार किंवा जे खासदार आज मिंधेसोबत जातात किंवा भाजपसोबत जात आहेत त्यांनी जनतेला फक्त एवढं उत्तर द्यावं की जे अयोध्या लुटत आहेत जे उज्जैनची भूमी लुटत आहेत तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसू शकता? असा सवालही त्यांनी केला. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आम्ही लोकांसमोर आणली आहेत. पण या शासनामध्ये जर भ्रष्टाचार तुम्ही केला भाजपच्या सत्तेत तुम्ही भ्रष्टाचार केला, तर तुम्हाला मंत्री बनायला किंवा मुख्यमंत्री बनायला अधिकची संधी असते, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.





























































