
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांसह सत्ताधारी आमदारही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर सवाल उपस्थित करत आहेत. दोन दिवसांपूर्वी विधानसभेमध्ये भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्नांची सरबत्ती करत दादा भुसे यांना घेरले होते. आता याच विषयावरून त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. टीईटी परीक्षेचे पेपर आग्रा येथे छापले जात होते, याची आपल्याला कल्पनाच नव्हती, अशी कबुली दादा भुसे यांनी खासगीत दिल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे. ते विधानभवन परिसरामध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शालेय शिक्षण विभागाने पेपर आग्र्यामध्ये छापले जात असल्याची कोणतीही माहिती आपल्याला दिली नव्हती, अशी कबुली दादा भुसे यांनी त्यांना खासगीत दिली. आग्र्यामध्ये ते पेपर छापले जायचे. आग्र्यावर विश्वास होता. निश्चितपणे ज्या आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना बंदिस्त करण्याचे पाप केले होते, त्याच आग्र्यामधून पेपर फुटला. आता मंत्री म्हणतात की यात बदल करून ऑनलाईन टीईटीचे पेपर करण्याच्या दृष्टीने विचार करत आहोत.
सरकारने सर्वच परीक्षांचा आढावा घ्यावा आणि उत्तम पद्धतीने फुल प्रूफ व्यवस्था केली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षा व्यवस्थेबद्दल जर एकदा अशा पद्धतीची भावना निर्माण झाली आणि मग कुणाचाही विश्वास बसणार नाही. नापस होणारा विद्यार्थीही म्हणेल, चूक माझी नाही, सरकारची आहे. कारण पेपर फुटल्यावर तो माझ्या नशिबात आला नाही, असेही ते म्हणाले.






























































