रानडुकराच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहिल्यानगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील वृद्ध महिलेचा रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. कांताबाई जगन्नाथ कदम (वय 66, रा. देऊळगाव सिद्धी, ता. अहिल्यानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. गुंडेगाव रोड येथील बेंदाडेवस्ती परिसरात ही घटना घडली.

मयत कांताबाई व त्यांचा नातू हे मंगळवारी (दि. 30) दुपारी बेंदाडेवस्ती परिसरात शेतात काम करत होते. यावेळी एका रानडुकराने रस्त्याने सायकलवर चाललेल्या व्यक्तीवर हल्ला केला. मात्र, तो थोडक्यात बचावला. त्यानंतर त्या रानडुकराने शेतात काम करणाऱ्या कांताबाई यांच्या नातवावर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याने हातातील खोऱ्याने त्याला हुसकावले. त्यानंतर झाडांच्या आळ्यातील गवत काढत असलेल्या कांताबाई यांना रानडुकराने जोराची धडक देत खाली पाडले. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांच्या शरीराचे लचके तोडले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कांताबाई यांना तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. मेडिकल ऑफिसर डॉ. काळे यानी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच, वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मयत कांताबाई यांच्यावर रात्री देऊळगाव सिद्धी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.