अखेर संगमनेरातील शिवप्रेमींच्या लढ्याला यश! शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासह डॉ. आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्षानुवर्षे निवेदनांचा मारा, पाठपुरावा आणि जनभावनांचा आवाज अखेर प्रशासनाला ऐकावा लागला. संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, नगर परिषदेकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शिवप्रेमी, आंबेडकरवादी अनुयायांच्या लढय़ाला यश आले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि शिवजयंती उत्सव युवक समितीने गेल्या अनेक वर्षांपासून या मागणीसाठी सातत्याने संघर्ष उभारला होता. वारंवार निवेदने, आंदोलने आणि पाठपुरावा करण्यात आला. अखेर या लढय़ाला यश मिळाले असून, आता प्रत्यक्ष स्मारक उभारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 15 फूट उंचीचा अश्वारूढ ब्राँझ गनमेटल पुतळा उभारला जाणार आहे, तर शिवाजी चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 12 फूट उंचीचा पूर्णाकृती भव्य पुतळा साकारला जाणार आहे.

नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकारातून तसेच मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया मार्गी लागली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शहरप्रमुख अमित चव्हाण, फैजल सय्यद, पप्पू कानकाटे, तालुकाप्रमुख भीमाशंकर पावशे, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय गुंजाळ, अमोल डुकरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.