शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आठ शहरांत मराठी भाषा विकास केंद्र! प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘मराठी भाषा विकास केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी येथे ‘मराठी भाषा विकास केंद्र’ सुरू करण्यात येतील, अशी माहिती आज मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेत नियम 92 अन्वये झालेल्या अर्ध्या तासाच्या चर्चेला उत्तर देताना मंत्री उदय सामंत बोलत होते. मराठीचा डंका जागतिक स्तरावर गाजवण्यासाठी लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी भाषा केंद्र स्थापन करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने पाच कोटी रुपये खर्चून ‘महाराष्ट्र मंडळाची’ ऐतिहासिक इमारत खरेदी केली असून, पुढील दोन महिन्यांत हे केंद्र पूर्णपणे कार्यान्वित होईल, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली. पेंद्राच्या निधीची वाट न पाहता राज्यात विश्व मराठी संमेलनासह वारकरी, बाल, युवा, महिला आणि कामगार साहित्य संमेलनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ व निळोबाराय यांचे विचार आणि साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने मोठा आर्थिक निधी उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. या चर्चेत आमदार उमा खापरे, ज. मो. अभ्यंकर, अमित गोरखे आणि मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

गावनिहाय मराठी भाषा अधिकारी

मराठी भाषाविषयक कामांना गती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र ‘जिल्हा भाषा अधिकारी’ नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी आगामी एका महिन्यात केली जाईल, असेही सामंत यांनी सांगितले. गावनिहाय मराठी भाषेचा अधिकारी असावा यासाठी प्रयत्न सुरू असून राज्यात एक ते दीड लाख गावनिहाय अधिकारी नेमण्यात येणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ‘उत्कृष्टता अध्ययन केंद्र’ स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत पुढील वर्षअखेरपर्यंत मराठी भाषा भवन

मुंबईतील मराठी भाषा भवनाचे काम वेगाने सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच ऐरोली येथे 34 कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे.

याशिवाय, जागतिक स्तरावर मराठीचा प्रसार करण्यासाठी 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्यात येणार असून त्यापैकी 39 मंच आधीच कार्यरत झाले आहेत.

जपानमधील वर्ल्ड एक्स्पोच्या समारोप कार्यक्रमात ‘जय जय महाराष्ट्र’ या गीताद्वारे मराठी संस्कृतीचे प्रभावी सादरीकरण झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.