
जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा येथे जलजीवनची कामे होऊनसुद्धा कामाचा मोबदला न मिळाल्याने, चिडलेल्या ठेकेदारांनी सहकुटुंब ‘शोले’ स्टाईल आंदोलन करत सगळ्यांचे लक्ष वेधले. गावाच्या पाण्याच्या टाकीवर चढून सुभाष सोनवणे आणि सुवर्णसिंह ठाकूर या दोन्ही ठेकेदारांनी जलजीवन मिशनचा कारभार चव्हाट्यावर आणला.
जळगाव जिल्ह्यात शासनाच्या जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पाण्याची टाकी उभारणे, जॅकवेल उभारणी इत्यादी कामे सोनवणे व ठाकूर या दोन्ही ठेकेदारांनी केली आहेत. यासाठी त्यांनी बँकांकडून कर्ज घेतले, तसेच पत्नीचे दागिने विकून पैसे उभारून कामे पूर्ण केली; मात्र अडीच वर्षे होऊनसुद्धा त्यांना मोबदला मिळाला नाही. “मनोज बियाणी या मुख्य ठेकेदाराने अडीच वर्षांपासून आपले पैसे दिले नाहीत आणि पैसे मागितले असता धमकावले जात आहे,” असा आरोप ठेकेदारांच्या परिवाराने केला आहे.






























































