
टीईटी पेपरफुटीप्रकरणी रोज नवीन अपडेट समोर येत असून, आज बिहारमधून दोन तर जम्मूतून एक अशा तीन आरोपींच्या मुसक्या ठाणे पोलिसांनी आवळल्या. सोनू सिंह, मिथुन सिंह आणि कपिल दहिया अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे. आज अटक केलेल्या तिन्ही आरोपींना भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले होते. तेथून त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
टीईटी परीक्षेचा पेपर परीक्षेच्या आदल्या दिवशी, म्हणजेच २७ जून रोजी भिवंडीतून फुटला होता. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी धीरज सिंग, राजीव शाव आणि आकाशकुमार स्वराजकुमार यांना हरियाणा आणि बिहारमधून अटक केली होती. त्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके स्थापन करण्यात आली. या पथकांनी बिहारमधील पाटणा येथे धडक देत, फरार झालेला मुख्य सूत्रधार विजेंदर गुप्ता याची पत्नी सुमनकुमारी गुप्ता हिला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस पथकांनी बिहार आणि जम्मू येथून सोनू सिंह, मिथुन सिंह आणि कपिल दहिया यांना अटक केली.


























































