मालाड रस्ता रुंदीकरणातील प्रकल्पग्रस्तांच्या इमारतींचे बांधकाम त्वरित पूर्ण करा, सुनील प्रभू यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड पूर्व येथील डीपी रस्ता रुंदीकरणातील प्रकल्पग्रस्तांसाठी दोन इमारती बांधण्यात येणार आहेत; पण या दोन्ही इमारतींचे बांधकाम रखडले आहेत. परिणामी  रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे रखडलेल्या एक व चार क्रमांकाच्या इमारतींचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली.

औचित्याच्या मुद्द्याद्वारे या प्रश्नाकडे लक्ष वेधताना सुनील प्रभू म्हणाले की, मालाड पूर्व, आप्पापाडा रिक्षास्टँड ते क्रांतीनगर येथील 13.40 चौ. मीटर डीपी रस्ता रुंदीकरणाचे काम प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी 185 पीएपी सदनिका अद्याप मुंबई महानगरपालिकेला मिळालेल्या नाहीत. एसआरए प्राधिकरणातर्फे सुरू असलेल्या गोकुळदुर्ग सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पातील 185 पीएपी सदनिका या मुंबई महापालिकेच्या पी उत्तर विभागाला हस्तांतरित करण्यासाठी पालिका आयुक्तांनी पत्राद्वारे विनंती केली आहे. त्यानुसार एसआरए प्राधिकरणाने 61 सदनिका इमारत क्रमांक ए आणि उर्वरित 124 सदनिका या क्रमांक चारमध्ये प्रस्तावित केल्या आहेत. पण इमारत क्रमांक एक बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही, तर इमारत क्रमांक चारचे आराखडे अजून एसआरए प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. परिणामी बाधितांचे पुनर्वसन रखडले आहे.  हा महत्त्वाचा डीपी रस्ता वाहतुकीसाठी खुला होऊ शकलेला नाही. स्थानिक रहिवाशांना वाहतूककोंडीचा प्रचंड सामना करावा लागत आहे. त्यामुळे या दोन्ही इमारतींचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.