‘समृद्धी’वरील वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा! मिलिंद नार्वेकर यांची विधान परिषदेत मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान महामार्गापैकी एक असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर बेकायदा उभे करण्यात येत असलेल्या टँकर, ट्रकमुळे जीवघेणे अपघात होत आहेत. या मार्गावरील वाढत्या अपघातांची संख्या पाहता प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत सरकारने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर चार हजारांपेक्षा जास्त अपघात झाले असून यात तीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गाच्या कडेला बेकायदा पार्किंग केलेले ट्रक, कंटेनर आणि कार हेच आता भरधाव वाहनांसाठी ‘मृत्यूचे सापळे’ बनत आहेत. धामणगाव रेल्वेजवळ एका उभ्या वाहनामुळे नुकताच पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एवढी भीषण दुर्घटना घडूनही या मार्गावरील परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, याकडे नार्वेकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. महामार्गाच्या कडेला बिनधास्त उभे केलेले ट्रक, कंटेनर आणि कार यामुळे समृद्धी महामार्गाची अवस्था आता मुंबईच्या एस. व्ही. रोड आणि लिंकिंग रोड सारखी झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली.