वाळूमाफियांचा महसूल पथकावर हल्ला; शेगाव दुमाला येथे थरार, 13 जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील शेगाव दुमाला भागातील भीमा नदीतीरावर सुरू असलेला अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात महसूल पथकाच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. ‘हप्ते घेऊन कारवाई कराल तर जीवे मारून टाकू,’ अशी धमकी वाळूतस्करांनी दिली आहे. यामुळे महसूल अधिकारी व कर्मचाऱयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या वाळू घाटांचे लिलाव बंद असल्याने बाजारात वाळूचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच वाळूच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भीमा नदीपात्रातून रात्री अवैध वाळूउपसा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जात आहे.

शेगाव दुमाला परिसरात रात्री अवैध वाळूउपसा सुरू असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राममहसूल अधिकारी दिगंबर आबासाहेब डोईफोडे, व्होळे ग्राममहसूल अधिकारी सुमित बबन जाधव, आवे ग्राममहसूल अधिकारी दिग्विजय राजकुमार शहा, शेवते ग्राममहसूल अधिकारी संतोष विलास ढोले, तसेच वाहनचालक नितीन तानाजी काळे यांचे पथक पहाटे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पथक तेथे पोहोचताच वाळूतस्करांनी वाहनावर दगडफेक केली. या घटनेत सरकारी वाहनाचे नुकसान झाले. सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने पथकाला कारवाई न करताच माघारी परतावे लागले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही व्यक्त होत आहे.

पाठलाग करत दहशत!
महसूल पथक शेगाव दुमाला येथे पेट्रोलिंग करत असताना मध्यरात्री एक बिगर नंबरचा ट्रक्टर दिसला. त्याचा पाठलाग करत असताना आमच्या पाठीमागे लगेच दुचाकीवर काही इसम आरडाओरडा करत येऊ लागले. दुचाकीवरील 10 ते 12 जणांनी आम्हाला शिवीगाळ करत सरकारी वाहनावर दगडफेक केली. यात गाडीचे नुकसान झाले, असे महसूल पथकातील अधिकाऱयाने सांगितले.

यांच्यावर गुन्हा दाखल
अक्षय अजिनाथ आटकळे, महादेव वैजिनाथ आटकळे, गोपाळ आटकळे, सचिन काटे, दीपक रामदास चव्हाण, मनोज आटकळे, बालाजी गाडेकर, बालाजी डिकरे, धनाजी सिद्धेश्वर आटकळे, वैभव पंढरीनाथ आटकळे, सोमनाथ दशरथ आटकळे, स्वप्नीलकुमार कोरे, तुषार आनंता चव्हाण (सर्व रा. शेगाव दुमाला, ता. पंढरपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.