पावसाळ्यात तुमच्या बाल्कनीला बनवा ‘ऑरगॅनिक फार्म’! घरच्या घरी उगवा सेंद्रीय भाज्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा हा निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ असतो. आणि हाच काळ घरच्या घरी बागकाम सुरू करण्यासाठी सर्वात उत्तम मानला जातो. बाजारातील कीटकनाशकयुक्त भाज्या विकत घेण्याऐवजी, तुम्ही या पावसाळ्यात काही निवडक सेंद्रीय भाज्या स्वतःच्या हाताने घरच्या घरी उगवू शकता. यामुळे तुम्हाला १०० टक्के शुद्ध आणि पौष्टिक अन्न तर मिळेलच, शिवाय तुमचे पैसेही वाचतील. पावसामुळे माती ओलसर राहते आणि झाडे वेगाने वाढतात. यामुळे गच्चीवर, बाल्कनीत किंवा कुंडीत कोणत्या सेंद्रीय भाज्या सहजपणे वाढवू शकता जाणुन घ्या.

भेंडी
भेंडी पावसाळ्यात सहज वाढणारी भाजी आहे. भेंडीसाठी उष्णता आणि आर्द्रता दोन्ही गोष्टी चांगल्या असतात. यासाठी, घरी भेंडी उगवण्यासाठी चांगल्या प्रतीचे बियाणे आणि 12-15 इंच खोल कुंडी घ्या. कुंडीमध्ये माती टाकून त्यामध्ये शेणखत मिसळा आणि बियाणे 1-2 इंच खोल पेरा. 5-7 दिवसांत या बीयांना कोंब येतील आणि 40-45 दिवसांत कुंडीमध्ये भेंडी आलेली दिसेल.

भोपळा
पावसाळ्यात भोपळा देखील लहान कुंड्यांमध्ये किंवा ग्रो बॅगमध्ये वाढवता येतो. पावसाळ्यात तो खूप वेगाने वाढतो. यासाठी 18-24 इंचाची कुंडी निवडा. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी मातीत कंपोस्ट आणि वाळू मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये 2-3 बिया पेरा आणि वेली उगवल्यावर त्यांना लाकडाच्या काठीने आधार द्या. दोन महिन्यांत या रोपाला भोपळी दिसू लागतील.

हिरवी मिरची, टोमॅटो
हिरवी मिरची, टोमॅटो हिंदुस्थानी खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. ही रोप 8-10 इंचीच्या कुंड्यांमध्ये सहजपणे वाढवता येते. घरच्या घरी ही रोपे लावण्यासाठी बिया काढून १ ते २ दिवस सावलीत सुकवा. नंतर त्या बिया सुपीक मातीत अर्धा सेमी खोल पेरा. त्यांना दिवसातून ५-६ तास सूर्यप्रकाश आणि दररोज पाणी द्या. किंवा पावसातील ओलावा मिरचीच्या वाढीस मदत करतो.

पालक, मेथी, कोथिंबीर
पालक, मेथी, कोथिंबीर पावसाळ्यात वेगाने वाढतो. हे वाढवण्यासाठी उथळ कुंडी किंवा ट्रे निवडा. त्यामध्ये बिया पेरताना त्या विखुरून पेरा. 7-10 दिवसांत याला पाने उगवतील. तसेच पाने कापून वापरल्याने पुन्हा वाढ होण्यास सुरुवात होईल.

कारले
कारले पावसाळ्यात चांगले वाढते. ते कुंडीत किंवा ग्रो बॅगमध्ये वाढवता येते. यासाठी किमान १२ ते १५ इंचाची कुंडी, ग्रो-बॅग किंवा सिमेंटची गोणी निवडा. सामान्य माती, ३० टक्के चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि कोकोपीट किंवा वाळू असे मिश्रण तयार करावे. यामुळे माती भुसभुशीत राहते आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. बिया लावण्यापुर्वी २४ तास कोमट पाण्यात भिजत ठेवाव्यात. यामुळे बियांचे आवरण मऊ होते आणि अंकुर लवकर फुटतात. कुंडीच्या मध्यभागी बिया 1-2 सेमी खोल दाबाव्यात. वरून माती हलकी दाबून पाणी द्यावे. बिया 7-10 दिवसांत अंकुरतात. त्यानंतर त्याला काठीचा आधार द्या. 55 – 60 दिवसांत वेलीला कारले येतात.