बद्रीनाथ मंदिराच्या गर्भगृहाचे गुप्त कॅमेऱ्याने चित्रीकरण, मुंबईतील यात्रेकरूला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील प्रसिद्ध श्री बद्रीनाथ धामच्या गर्भगृहात गुप्त कॅमेऱ्याने व्हिडिओ चित्रीकरण करून मंदिराची प्रतिष्ठा, सुरक्षा आणि गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी चमोली पोलिसांनी एका यात्रेकरूला अटक केली आहे. हा यात्रेकरू मुंबईचा रहिवासी असून तो आपल्या चष्म्यामध्ये लावलेल्या स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने गर्भगृहाचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून हा गुप्त कॅमेरा असलेला चश्मा जप्त केला आहे.

श्री बद्रीनाथ मंदिराच्या स्थापित नियमांनुसार आणि सुरक्षा मानकांनुसार मंदिराच्या गर्भगृहात कोणत्याही प्रकारचे छायाचित्रण किंवा व्हिडिओग्राफी करण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येताच चमोली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांनी उत्तराखंड पोलीस कायद्याच्या कलम 81 अंतर्गत या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

मंदिराची सुरक्षा, धार्मिक शिष्टाचार आणि गोपनीयता राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी सतर्कता दाखवत, यात्रेकरूच्या कॅमेऱ्यातून हस्तगत केलेले सर्व फोटो आणि व्हिडिओ तात्काळ हटवले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, चमोली पोलिसांनी सर्व भाविकांना मंदिर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करू नये, अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.