सामन्यानंतर मैदानात राडा, एम्बाप्पेला चेंडू मारला; खेळाडूंमध्ये धक्काबुक्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्रान्सच्या विजयानंतर मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. अंतिम शिट्टी वाजताच दोन्ही संघांचे खेळाडू आमने-सामने आले आणि काही काळ जोरदार धक्काबुक्की झाली. याचदरम्यान फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बाप्पे आणि पॅराग्वेचा गोलरक्षक ऑलँडो गिल यांच्यातही वाद रंगला. एम्बाप्पेने हस्तांदोलनास नकार दिल्याचा राग मनात धरून गिलने त्याच्या पाठीवर सामन्यातील चेंडू फेकून मारला, मात्र एम्बाप्पेने कोणतीही प्रतिक्रिया न देता विजयाचा आनंद साजरा करण्यालाच प्राधान्य दिले.

संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये अनेकदा शाब्दिक चकमकी आणि किरकोळ धक्काबुक्की झाली. एका प्रसंगी एम्बाप्पे आणि पॅराग्वेचा डिएगो गोमेझ यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पॅराग्वेच्या खेळाडूंनी एम्बाप्पेला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून फ्रान्सचे खेळाडूही मैदानात धावून आले आणि काही क्षण तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पंचांनी सुरुवातीला मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही संघांचे खेळाडू एकत्र आल्यानंतर परिस्थिती अधिकच तापली.

हस्तांदोलन नाकारल्याने गिल संतापला

सामना संपल्यानंतर ऑलँडो गिल हा एम्बाप्पेचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे गेला आणि हस्तांदोलनासाठी हात पुढे केला, मात्र एम्बाप्पेने त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे चालत राहणे पसंत केले. यामुळे संतापलेल्या गिलने सामन्याचा चेंडू एम्बाप्पेच्या पाठीवर फेकला. चेंडू लागूनही एम्बाप्पेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मोठा वाद टळला.

तर अखिलाडू वृत्तीनेही खेळू : एम्बाप्पे

सामन्यानंतर एम्बाप्पे म्हणाला, ‘हा सामना कठीण असणार याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. गरज पडली तर आम्ही अखिलाडू वृत्तीनेही खेळू शकतो. आम्ही फक्त आकर्षक खेळ करणाराच संघ नाही, तर प्रत्येक प्रकारचा खेळ आम्हाला जमत असल्याचे आम्ही दाखवून दिले. फुटबॉलमध्ये योग्य किंवा अयोग्य अशी शैली नसते. शेवटी विजय महत्त्वाचा असतो. पॅराग्वेने आम्हाला त्यांच्या शैलीत हरवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांनाच त्यांच्या खेळात पराभूत केले.’