Dapoli News – महावितरणच्या कामानंतर हर्णेतील मुख्य रस्ता खड्डेमय; वाहनचालक, विद्यार्थी व नागरिक त्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यातील हर्णे एसटी स्टँडसमोरील मुख्य रस्त्यावर महावितरण कंपनीने भूमिगत वीज केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामानंतर रस्त्याची योग्य दुरुस्ती न केल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे.

मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, दुचाकीस्वार घसरण्याच्या तसेच लहान-मोठे अपघात घडण्याच्या घटना वाढल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले. याच मार्गावरून शाळकरी विद्यार्थीही ये-जा करत असून, भरधाव वाहनांमुळे खड्ड्यातील चिखलमिश्रित पाणी त्यांच्या अंगावर उडत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या समस्येबाबत ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.