पावसाळ्यातील आजारांवर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलवा, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात उद्भवणारे आजार व साथीचे आजार यावर चर्चा करण्याकरिता पालिकेने विशेष बैठक आयोजित करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात, या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यासंदर्भातील पत्र नगरसेवक यशोधर फणसे यांनी महापौरांना लिहिले आहे.

मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू, कॉलरा, गॅस्ट्रो तसेच सर्दी, खोकला यांसारखे संसर्गजन्य आजार व साथीचे आजार यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्याकरिता महानगरपालिकेची तातडीची विशेष सभा आयोजित करण्यात यावी. स्थायी समिती सदस्य महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३६ (ह) अन्वये महापालिकेची विशेष सभा बोलविण्यात यावी, अशी मागणी यशोधर फणसे यांनी केली.