
धुवाधार पावसामुळे वसई, नालासोपाऱ्याला तीन दिवस पुराचा वेढा पडला आणि लाखो नागरिकांचे अतोनात हाल झाले. याचा गैरफायदा ट्रॅक्टरचालकांनी उचलला. पुरात अडकलेल्यांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी प्रतिमाणशी ५०० रुपये उकळत ट्रॅक्टरचालकांनी वसई-विरारकरांची बेफाम लूट केली. एका कुटुंबाचे स्थलांतर करण्यासाठी तर तब्बल पाच हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे.
वसई, नालासोपारा, विरार, नायगाव या शहरांना पुराचा मोठा फटका बसला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. भूमाफियांनी वसईतील नैसर्गिक खाड्या आणि नालेदेखील बुजवून टाकले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला. बेकायदा बांधकामे, तिवरांची केलेली कत्तल हेदेखील पुराचे कारण ठरले आहे.
प्रशासन फेल; लाखो नागरिक वाऱ्यावर
पुरात अडकलेल्या वसई-विरारकरांना दिलासा देण्यात पालिका प्रशासन सपशेल फेल ठरले, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत यांनी केला. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रशासनाने विशेष गाड्यांची सोय करणे गरजेचे होते, मात्र पालिकेच्या गाड्याच रस्त्यावरून गायब झाल्या होत्या. त्याचाच फायदा घेऊन ट्रॅक्टरचालकांनी नागरिकांची बेसुमार लूट केली, असे प्रथमेश राऊत म्हणाले.
महावितरणविरोधात वसईत आंदोलन
वसई, नालासोपाऱ्यात तब्बल तीन दिवसांपासून वीज गायब झाली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी बुधवारी रस्त्यावर उतरून महावितरणच्या विरोधात जोरदार आंदोलन करत उग्र आंदोलनाचा इशाराही दिला.


























































