
केरळम पोलिसांची अंतर्गत फाईल्स आणि डेटा हाताळणारी यंत्रणा (Application) गेल्या चार दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. हा प्रकार सायबर हल्ल्यामुळे साईट हॅक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाच्या उच्चस्तरीय तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या ‘केल्ट्रॉन’ (Keltron) या कंपनीमार्फत एका खाजगी कंपनीला या सॉफ्टवेअरच्या देखभालीचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून ही यंत्रणा बंद असल्याने पोलीस दलातील अंतर्गत फाईल्सची देवाणघेवाण आणि रोजचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
यंत्रणा ठप्प झाली असली, तरी पोलिसांचा कोणताही गोपनीय डेटा लीक झालेला नाही, असा दावा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. ही यंत्रणा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी तज्ज्ञांचे पथक युद्धपातळीवर काम करत आहे.
सर्वसामान्यांच्या सेवा सुरू
दरम्यान, या बिघाडाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसलेला नाही. नागरिक ज्या वेबसाईट आणि ॲपद्वारे केरळम पोलिसांच्या सेवांचा लाभ घेतात, ती यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित असून सुरळीत सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या सायबर हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

























































