
राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे सभागृहात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी भर सभागृहात भाजप आमदारांना खडे बोल सुनावत राम मंदिराच्या मुद्द्यावरून थेट प्रहार केला.
सभागृहात नेमकं काय घडलं?
सभागृहाचे कामकाज सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. याच गोंधळात भाजप आमदाराच्या वक्तव्यावर आणि देहबोलीवर आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले. अत्यंत आक्रमक होत त्यांनी भाजप आमदाराला जागेवरच सुनावले.
“तुमचं वय बघा, कोपऱ्यात बसून अहंकार दाखवताय”
आदित्य ठाकरे यांनी भाजप आमदाराला फटकारले. ते म्हणाले, “नीट बोला, नीट बोला… वय बघा तुमचं. नुसता बसलाय कोपऱ्यात, प्रत्येक वेळी असा अहंकार…” यावेळी सभागृहात गोंधळ वाढल्याने अध्यक्षांनी आणि इतर सदस्यांनी सर्वांना खाली बसून शांतता राखण्याची वारंवार विनंती केली.
राम मंदिरावरून थेट हल्लाबोल
गोंधळ सुरू असतानाच भाजप आमदाराने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावर आदित्य ठाकरे अधिकच संतापले आणि त्यांनी थेट राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला. “अधिकार कोणी दिला यांना बोलायचा? अरे, राम मंदिराच्या चोऱ्या करणारे तुम्ही आहात,” अशा घणाघाती शब्दांत आदित्य ठाकरेंनी भाजपला उघडे पाडले.
राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये! आदित्य ठाकरे आक्रमक, भाजप आमदाराला सुनावले खडे बोल pic.twitter.com/voXjavNryd
— Saamana Online (@SaamanaOnline) July 9, 2026




























































