संजू सॅमसनचा चाहत्यांना धक्का! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून वगळल्यानंतर आता मोठ्या स्पर्धेतून घेतली माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या त्याच्या खराब फॉर्ममुळे टीकेचा सामना करत आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या गेल्या 3 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याला केवळ 6 धावा करता आल्या. या खराब कामगिरीचा फटका त्याला सहन करावा लागला असून, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्याच्या अंतिम 11 मधून त्याला डच्चू देण्यात आला होता. त्याच्या जागी युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला संघात संधी देण्यात आली होती.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजू सॅमसनने केरल क्रिकेट लीगच्या (KCL 2026) आगामी तिसऱ्या हंगामातून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे. कोच्चि् ब्लू टायगर्सने त्याला आपल्या रिटेंशन लिस्टमध्ये स्थान दिले नव्हते आणि आता 156 खेळाडूंच्या लिलाव यादीतही त्याचे नाव समाविष्ट नाही. सॅमसनने स्वतःहूनच या लिलावात उतरण्यास नकार दिल्याचा खुलासा KCL गवर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष नजर माचान यांनी केला आहे. दरम्यान, केरल क्रिकेट लीगचा हा तिसरा हंगाम 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत खेळवला जाणार आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात कोच्चि ब्लू टायगर्सने संजू सॅमसनला 26.80 लाख रुपयांना खरेदी केले होते, ज्यामुळे तो या लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. गेल्या हंगामात त्याने चमकदार कामगिरी करत अवघ्या 5 डावांत 368 धावा कुटल्या होत्या.