
वारकऱ्यांना सुलभ आणि तत्पर दर्शन देण्यासाठी मंदिर समितीने केलेले नियोजन व्हीआयपी भाविक आणि दर्शन रांगेतील घुसखोर यांच्यामुळे कुचकामी ठरते आहे. त्यामुळे दर्शन रांगेत प्रामाणिकपणे उभा असणाऱ्या भाविकाला देवाच्या पायावर डोके टेकवायला चोवीस तासाहून अधिक वेळ लागतो तर शॉर्टकट मार्गाने घुसखोरी करणाऱ्या भक्ताला चोवीस मिनिटांमध्ये दर्शन घडते. दर्शनाच्या वेळेतील हा विरोधाभास दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक पावलं उचलण्याची आवश्यकता वाटते.
येत्या 25 जुलै रोजी पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होतोय. येणाऱ्या लाखो भाविकांना श्री विठ्ठल रखुमाईचे सुलभ व तत्पर दर्शन व्हावे यासाठी मंदिर व्यवस्थापन, पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग समन्वयाने नियोजन करतात. वारीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना तत्पर दर्शन मिळण्याच्या दृष्टीने येत्या 16 जुलै पासून श्री विठ्ठल मंदिर मंदिर चोवीस तास खुले ठेवले जाणार आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत उभे राहता यावे यासाठी गोपाळपूर येथे तात्पुरते नऊ पत्राशेड उभा केले आहेत. एका शेडमध्ये अडीच ते तीन हजार भाविक या शेडमध्ये उभे राहू शकतात. या शेड मध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीचा त्रास होणार नाही याचीही दक्षता घेतली गेली आहे. वारीच्या कालावधीत जास्तीत जास्त वारकऱ्यांना दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी एक मिनिटांमध्ये साधारणपणे पस्तीस भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळेल अशी व्यवस्था केली आहे. मंदिर समितीच्या नियोजनाप्रमाणे एक मिनिटांमध्ये पस्तीस भाविकांना दर्शन दिले जात असेल तर एक तासांत एकवीसशे भाविकांना दर्शन मिळणे अपेक्षित आहे.
श्री विठ्ठलाचे चरण ते गोपाळपूर पत्राशेड हे अंतर साधारण अडीच किलोमीटर आहे. दर्शन रांगेतील भाविक एकमेकांना चिटकून उभा राहिल्यास तब्येतीनुसार अडीच ते तीन हजार व्यक्ती उभा राहू शकतात. अनेकवेळा दर्शन रांग एकेरी न चालता तीन चार रांगेत चालते. दर्शन मंडपानंतर मंदिरात जाताना ही रांग पुन्हा एकेरी होते. एक किलोमीटरची तिहेरी रांग गृहीत धरली तरी देवाच्या चरणापासून गोपाळपूरच्या पहिल्या पत्राशेड पर्यंत साधारणपणे सात ते आठ हजार भाविक पदस्पर्श रांगेत उभे राहू शकतात. मंदिर समितीच्या दर्शन व्यवस्थेप्रमाणे एक तासात एकवीसशे भाविक असे गृहीत धरले तर आठ हजारांव्या भाविकाचे दर्शन चार ते पाच तासांत होणे अपेक्षित आहे. मात्र समितीने केलेल्या नियोजनाप्रमाणे दर्शन व्यवस्था होताना दिसत नाही.
गोपाळपूर पत्राशेडमध्ये उभ्या असलेल्या भाविकाला दर्शनासाठी किमान आठ ते दहा तासांचा वेळ लागतो. हा अवांतर वेळ लागण्याचे कारण म्हणजे दर्शन रांगेत होणारी घुसखोरी आणि मंदिर व्यवस्थापनाच्या माध्यमातून दिले जाणारे शॉर्टकट व्हीआयपी दर्शन.
देवाचे चरण ते गोपाळपूर पत्राशेड या मार्गावर असलेले संत माऊली दर्शन मंडपातील खुश्कीचे मार्ग, स्कायवॉक शेजारी असलेली स्थानिक लोकांची घरे आणि त्यातून होणारी घुसखोरी, दर्शन रांगेत बंदोबस्त करण्यासाठी उभे असलेले पोलीस, खाजगी कमांडो आणि होमगार्ड यांच्याकडून आर्थिक लाभ घेऊन केली जाणारी घुसखोरी, रांगेशेजारील मठ, धर्मशाळा यांच्या प्रवेश मार्गातून मोठ्या संख्येने घुसखोरी चालते.
एक तासांत एकवीसशे भाविकांना पदस्पर्श मिळणे समितीच्या नियोजनानुसार अपेक्षित आहे. मात्र प्रामाणिकपणे उभा असलेल्या भाविकांमधील एक हजार भाविकांनाचं या दर्शनाचा लाभ मिळतो. बाकी उर्वरित विविध मार्गाने मंदिरात घुसखोरी करतात हे समितीच्याच आकडेवारी वरुन स्पष्ट होते.
वारीच्या तोंडावर रुजू झालेले सोलापूरचे जिल्हाधिकारी एन कार्तिकेयन हे वारीचे अतिशय सूक्ष्म नियोजन करीत आहेत. आषाढीसाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना सर्व त्या मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यासाठी त्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.


























































