
शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि परिचारिकांवर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण करणारे शिंदे गटाचे हल्लेखोर नगरसेवक रमेश म्हात्रे यांची 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. रमेश म्हात्रे यांना शुक्रवारी कल्याण कोर्टात हजर करण्यात आले होते.
शास्त्रीनगर रुग्णालयात मंगळवारी एका गर्भवती महिलेला दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील एनआयसीयूचे सर्व दहा बेड भरले असल्याने संबंधित महिलेला पुढील उपचारांसाठी अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. याच कारणावरून शिंदे गटाचे डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येऊन दोन महिला व पुरुष डॉक्टर आणि नर्सना बेदम मारहाण केली.
मारहाणीमुळे रुग्णसेवा करणारे डॉक्टर, नर्स दहशतीच्या छायेत असताना रमेश म्हात्रे मात्र उजळ माथ्याने फिरत होते. सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे पोलिसही त्यांना अटक करण्यास धजावत नव्हते. त्यामुळे राज्यभर संतप्त पडसाद उमटले. इंडियन मेडिकल असोसिएशननेही कामबंद आंदोलन केले. शिवाय शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सकाळी या गुंडगिरीविरोधात विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवला. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱयांना न्याय देण्यासाठी बुधवारी थेट डोंबिवलीत धडक दिली. आदित्य ठाकरे, रोहित पवार डोंबिवलीत धडकताच पोलीस अचानक अॅक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी रमेश म्हात्रे यांना अटक केली होती.





























































