
मुख्यमंत्र्यांना झोंबणार असेल तरीही महाराष्ट्र हिताचे प्रश्न आम्ही विचारणारच असा निर्धार शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच पावसाळ्यात झालेल्या नुकसानीबाबत कुणी प्रश्न विचारू नये म्हणून मिंधे सलाईन लावून बसले होते असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.
विधीमंडळाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जे काही सरकारला अडचणींच ठरतं, ते लगेच हटवलं जातं. काल विधानसभेत जी बाचाबाची झाली ती अधिकृत वेबसाईटवरून हटवण्यात आली आहे. पण ज्यांच्यापर्यंत मुद्दा पोहोचायचा होता तो पोहोचला आहे. उद्या भाजपने राम मंदिरही डिलीट करू नये, कारण तेच त्यांच्या अडचणीचं ठरत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ज्या रमेश म्हात्रेंनी डॉक्टरांवर हल्ला केला, घाणेरड्या शब्दांत शिवीगाळ केली, त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ही सर्व घटना घडल्यानंतर आम्ही त्या रुग्णालयाला भेट दिली. आणि आम्ही जेवाहा जाब विचारला तेव्हा म्हात्रेंना अटक झाली. ज्या केसप्रकरणी त्यांना अटक झाली त्यातून वाचण्यासाठी म्हात्रे दुसऱ्या रुग्णालयात दाखल झाले. ही कुठली मर्दानगी? म्हात्रेंनी माफी मागायला हवी होती. गृहमंत्री असलेले मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधलेले आहेत माहित नाही. भाजप नेते गणपत गायकवाड यांनी पोलीस स्थानकात गोळीबार केला होता. ते भाजपचे आहेत म्हणून अद्याप तुरुंगात आहेत आणि म्हात्रे मिंधे गटात आहेत म्हणून ते बाहेर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधले आहेत हे त्यांना विचारा एकदा. रमेश म्हात्रे यांचे नगरसवेकपद रद्द केले पाहिजे अशी मागणी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उचलल्यास अजामीनपात्र गुन्हा ठरतो. दुसरी गोष्ट अशी की सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. आणखीन काय पुरावे हवे आहेत. मी पोलिसांना दोष देणार नाही कारण पोलीस हे गृहखात्याच्या आदेशावरच चालतात. पण पोलिसांनी म्हात्रे यांना रुग्णालयात का दाखल होऊ दिलं? आणि थर्ड डिग्री का नाही दिली. या म्हात्रेंवर कारवाई झाली नाही कारण तिथले खासदार त्यांच्या जवळचे आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दोन वर्षांपूर्वी ठाण्यातील कोपरी पुलाचे उद्घाटन झाले होते. तिथे किती खोल खड्डे झाले आहेत ते पहा. समृद्धी महामार्ग 50 फूटही सपाट नाही. असा प्रकार मिसिंग लिंकवर आहे. मुख्य बाब अशी की जिथे जिथे भ्रष्टाचार झाला आहे तिथे आम्ही प्रश्न विचारणार. ही बाब मुख्यमंत्र्यांना कितीही झोंबली तरी आम्ही थांबणार नाही.
हे सरकार कुणाचंही नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. तरी सरकार आपल्याच धुंदीत आहे. भ्रष्टाचार करायला पैसे आहेत, आमदार-खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पण शेतकऱ्यांना मदत करायला पैसे नाही. आमचे सहा खासदार विकत घ्यायला जे पैसे वापरले तेच पैसे जर त्यांनी शेतकऱ्यांना वाटले असते तर अनेकांची कर्ज सरसकट माफ झाली असती.
फोडाफोडीचे राजकारण हे भ्रष्टनाथ मिंध्यांनी केले आहे. भ्रष्टनाथ मिंध्यांचा हात समृद्धीमध्ये आहे, मिसिंग लिंकमध्ये आहे, कोपरी पुलाच्या खड्ड्यात आहे. जेव्हा पाऊस पडत होता, कुणी प्रश्न विचारू नये म्हणून हेच मिंधे सलाईन लावून बसले होते. मिंध्यांना उत्तर देता येत नव्हतं म्हणून ते लपून बसले होते.
मराठी पाट्यांचा विषय आम्ही धरून लावत आहोत. पण आपण अध्यक्ष नार्वेकरांचं मराठी ऐकलं असेल. दीनदयाळ मंगेशकर आले होते त्यात. काल आपण पाहिलं मुख्यमंत्र्यांना हिंदीत दमदाटी करण्याची हौस होती. फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून शेवटचे अधिवेशन आहे. केंद्र सरकारमध्ये जाण्याची ते तयारी करत आहेत म्हणून ते हिंदीत बोलत होते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.





























































