
>> चंद्रकांत बाबर
प्रसिद्ध साहित्यिक व अनुवादक डॉ. संजय बोरुडे यांनी ‘कवितेपेक्षा दीर्घ उदासी’ हा प्रख्यात हिंदी साहित्यिक विमलेश त्रिपाठी यांच्या ‘कविता से दीर्घ उदासी’ या कवितासंग्रहाचा केलेला अनुवाद. 72 कवितांचा समावेश असलेला 157 पानांचा हा कवितासंग्रह अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण आहे. समकालातील विलक्षण अस्वस्थ करणारे समाज वास्तव, धर्म आणि राजसत्ता या दोहोंमध्ये भरडत चाललेल्या सामान्य माणसांच्या दुःखाची मीमांसा करणारी ही कविता निर्भीड सामाजिक भूमिका घेऊन अवतरते. वरवर व्यक्तिकेंद्री वाटणाऱया सामाजिक आंतरक्रियांना व्यक्तिगत अनुभूतीतून प्रकट होणाऱया अस्सल सामाजिक कविता या कवितासंग्रहात आहेत. ‘लोकल ते ग्लोबल’ अशा प्रवासातील स्वानुभवाला भवतालातील इतरांच्या अनुभवांशी जोडून पाहण्याची किमया साधणाऱया या कविता वाचकाला अंतर्मुख करून दुःखाची कारणमीमांसा करायला लावतात.
विमलेश त्रिपाठी हे हिंदीतील महत्त्वाचे साहित्यिक असून ‘हम बचे रहेंगे’, ‘एक देश और मरे हुए लोग’, ‘कविता से लंबी उदासी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित असून ‘अधुरे अंत की शुरुआत’ हा कथासंग्रह व ‘पानवास पर प्रेम’ ही कादंबरी प्रसिद्ध आहे. अशा महत्त्वाच्या समकालीन कवीची कविता तितक्याच प्रतिभावान साहित्यिकाने भाषांतरित केली आहे.
माझ्या भोवतालची माणसे मला नेहमी प्रभावित करत आली आहेत. ते बोलत असतील तर मी ऐकताना त्यामध्ये रंगून जातो. ते कोण आहेत त्याचे मला काही सोयरसुतक नसते, पण मी असा हळूच त्यांच्या आनंद किंवा दुःखात शिरतो. अशा रीतीने माझे विचार तरंग आणि बाहेरच्या दुनियेतील घटित परिवर्तन मिळून माझ्यामध्ये कवितेचे विश्व उभे राहते. जे मी प्रत्येक्ष अनुभवले नाही त्याला मी माझ्या कवितेचा विषय बनवू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी मलपृष्ठावर स्पष्ट केलेली आहे. आपल्या भूमिकेशी तेच प्रामाणिक राहताना दिसतात. आजूबाजूचे सामाजिक वास्तव अतिशय चिंताजनक झाल्याचा अभिप्राय नोंदवताना माणसामाणसांत दरी निर्माण करणाऱया समाजविघातक विषवृक्षांना खतपाणी घालणाऱया व्यक्ती, पक्ष, संघटना यांचा पाठपुरावाच कवी करतो.
कोण आहेत हे लोक, जे या आदिम गर्दीत गुपचूप सामील झाले आहेत. गर्दीला, जमावाला धर्म चिकटला आणि रक्तपिपासून वृत्ती निर्माण झाली. ज्या वृत्तीमुळे मानवतावादाला काळिमा फासला गेला. त्या अमानवी वृत्तीचा निषेध नोंदवतो. ‘गाईची गोष्ट’ ही कविता धर्माच्या अंगाने विकसित होणाऱया समाज वास्तवाचे ओंगळवाणे दर्शन घडवत सांप्रत अवस्थेचा खरपूस समाचार घेते. या गोष्टीतील गाईचा प्रवास वाराणसी ते राजस्थानमार्गे दिल्ली असा होतो. या प्रवासात गाईला आलेले अनुभव विचित्र असे आहेत. या गोष्टीतील गाईचे गायब होणे म्हणजे गाईचे ‘गाय’ म्हणून असणारे स्वतंत्र अस्तित्वच नष्ट करून तिला धर्माचे प्रतीक बनवून उभे गेले गेल्याचे कवी निदर्शनास आणतो. कविता अशी धर्मचिकित्सा करीत श्रमिक, कष्टकऱया बायाबापडय़ांच्या दुःखाचा उद्गार बनताना दिसते. जेव्हा चहाचे मळे नव्हते तेव्हा या बायांच्या डोळ्यांतले पाणी होते तसेच होते असा स्त्राrवादी सूर आळवतानाच पाठवायचंच असेल तर मला त्या लोहाराकडे पाठवा
जो माझ्या शतकांच्या बेडय़ा तोडून टाकेल अशी विनंती त्यांच्या कवितेतील स्त्री करताना दिसते. तिला धर्माने लाभलेल्या कोणत्याही बेडय़ा नकोशा झाल्या आहेत. चालीरीती रूढीपरंपरेने बांधलेल्या बेडय़ा तोडून तिला मुक्त व्हायचं आहे. अशा काळात केवळ लढणेच आपल्या हातात आहे. हा लढा एकाकी होऊन चालणार नाही. एका अशा काळात मागतो आहे मी तुझा हात ठेव माझ्या खरबुडय़ा हातावर… आपल्यासाठी नाही तर तुझ्या आणि माझ्या इतिहासासाठी…
विमलेश त्रिपाठी यांची कविता आशय अभिव्यक्तीच्या दृष्टीने विद्रोही अंगाने विकास पावते. शोषितांच्या, पीडितांच्या, शेतकऱयांच्या, स्त्रियांच्या व सर्वहारांच्या, सामान्य माणसांच्या बाजूने उभी राहते. शोषित-पीडितांचा आवाज बनते. हा आवाज ऊरबडवा न होता संयमाने आपली म्हणून नैतिक जबाबदारी ध्वनित करतो. सत्याचा पुनः पुन्हा उच्चार करतो. हा उच्चार सद्यकाळात साधासोपा मुळीच राहिलेला नाही. याची जाणीव असूनदेखील हा कवी सत्याच्या बाजूने उभा राहतो व तशी स्पष्ट भूमिका घेतो. हा त्याच्या सांस्कृतिक लढाईचा भाग आहे. याचे पुरते भान असल्यामुळेच त्याची ही कृती महत्त्वाची ठरते. डॉ. संजय बोरुडे हे साहित्य क्षेत्रातील सर्व प्रांतांत मुक्त मुशाफिरी करणारे गंभीर लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या सांस्कृतिक जाणिवा अतिउच्च असल्यामुळेच आपल्या विचारांच्या समानधर्मी कवीची महत्त्वपूर्ण कविता आपल्या भाषेतील लोकांना ओळखीची व्हावी यासाठीचा त्यांचा प्रयत्न महत्त्वपूर्ण व मोलाचा आहे.
कवितेपेक्षा दीर्घ उदासी
लेखक ः विमलेश त्रिपाठी
अनुवाद ः संजय बोरुडे
प्रकाशक ः साहित्याक्षर प्रकाशन, नगर
पृष्ठे ः 157, ह मूल्य ः 220 रुपये




























































