‘पवित्र’ पोर्टलमुळे शिक्षक भरती रखडली, पालिका शाळांतील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
school-teacher

राज्य सरकारच्या ‘पवित्र पोर्टल’च्या संथ कारभारामुळे मुंबई महापालिका शाळांमधील सुमारे 1,200 शिक्षकांची भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. नियमानुसार शिक्षकांची भरती केवळ या सर्वसमावेशक पोर्टलद्वारेच करणे बंधनकारक असल्याने महापालिकेचे हात बांधले गेले आहेत. पालिकेने आपला प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असला तरी तिथून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे पालिका शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिक्षक भरती रखडल्याने पालिकेने ‘तासिका मानधन’ (घडय़ाळी तास) तत्त्वावर खाजगी शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती केली आहे. मात्र या कंत्राटी शिक्षकांमध्येही तीव्र असंतोष पसरला आहे. तासाला केवळ 150 इतके तुटपुंजे मानधन मिळत असल्याने ‘महागाईच्या काळात या दरात शिकवणे कसे परवडणार?’ असा संतप्त सवाल हे शिक्षक उपस्थित करत आहेत. यावर पर्याय म्हणून ‘महापालिकेने मानधन वाढीचा प्रस्ताव तयार केला आहे, त्यानुसार शिक्षकांना दिले जाणारे मानधन वाढवण्यात येईल,’ अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. मात्र हा प्रस्ताव कधी अमलात येणार आणि मानधनात नेमकी किती वाढ होणार, याबाबत काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही.

पवित्र पोर्टलद्वारे नियमित भरती प्रक्रिया सुरू झाल्यास सध्या काम करत असलेल्या या कंत्राटी शिक्षकांचे काय करायचे, असा मोठा पेच पालिकेसमोर आहे.

शिक्षणमंत्र्यांना भेटणार

‘‘आम्हाला 1,200 शिक्षकांची भरती तातडीने करायची आहे, पण पवित्र पोर्टलमुळे आमचे हात अडकले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. तसेच लवकरच राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत,’’ अशी माहिती महापालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी दिली. पोर्टलच्या प्रक्रियेला वेळ लागणार असेल, तर महापालिकेला स्वतःच्या स्तरावर भरती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही शिक्षण मंत्र्यांकडे करणार असल्याचे शिरवडकर यांनी सांगितले.