
अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. यात्रेकरूंसह सामान्य नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा दलांनी महामार्गावर व्यापक तपासणी मोहीम आणि सतत गस्त सुरू केली आहे. सुरक्षा दलांकडून रात्रीची विशेष गस्त, ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ (QRT) च्या वाहनांद्वारे गस्त, तसेच संवेदनशील ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी संयुक्त सुरक्षा पथके सातत्याने देखरेख करत आहेत.
रामबन जिल्ह्यातील बनिहाल परिसरात सुरक्षा दलांनी मोठी संयुक्त तपासणी मोहीम राबवून वाहनांची तपासणी केली. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि यात्रा शांततेत पार पडावी, यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग-44 वर केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ‘रोड ओपनिंग पार्टी’ (ROP) मोहिमेद्वारे मार्ग सुरक्षित ठेवण्याचे काम करत आहे. सुरक्षेबरोबरच यात्रेकरूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जात आहे. असे वृत्त इकाॅनाॅमिक टाइम्सने दिले आहे.
रामबन जिल्ह्यातील चंदेरकोट येथे CRPF च्या 84 व्या बटालियनने 24 तास कार्यरत मोबाईल हेल्थ कॅम्प सुरू केला आहे. येथे यात्रेकरू आणि स्थानिक नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जात असून, अत्याधुनिक जीवनरक्षक रुग्णवाहिका, आवश्यक औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. CRPF चे 84 व्या बटालियनचे कमांडंट एन. रणबीर सिंग यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत कृष्णन यांच्या नेतृत्वात हे आरोग्य शिबिर कार्यरत आहे.
यंदाची 57 दिवसांची अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू झाली असून, 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी तिची सांगता होणार आहे. यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्य सुविधांसाठी प्रशासन व सुरक्षा यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.
























































