
हॉर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत चालला असून आखाती देशात जोरदार धुमश्चक्री सुरू झाली आहे. या दरम्यान इराणने बहरीन येथील अमेरिकन लष्कराचा संपूर्ण ड्रोन ताफा उद्ध्वस्त केल्याचा मोठा दावा केला आहे.
दरम्यान अमेरिकेने इराणच्या माहशहर भागातील एका शेतीसाठीच्या पाणी उपसा केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले सर्व राजनैतिक आणि शांततेचे प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरल्याचे इराणने म्हटले आहे.
अमेरिकन लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) पर्शियन आखातातून जाणाऱ्या आणखी एका व्यापारी जहाजाला लक्ष्य केले होते. त्यानंतरच अमेरिकेने ही नवी आक्रमक कारवाई सुरू केली. या समुद्री मार्गावरून जगातील एकूण तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यापैकी तब्बल एक पंचमांश भागाची वाहतूक केली जाते. या सागरी मार्गावरील वाहतुकीच्या स्थितीबाबत वॉशिंग्टन आणि तेहरान दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत.
दरम्यान, गेल्या दोन दिवसात या भागातील अमेरिकन लष्करी तळांवरही इराणकडून जोरदार गोळीबार आणि हल्ले करण्यात आले. इराणने स्वतः या हल्ल्यांची कबुली दिली असून, यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध पूर्णपणे ताणले गेले आहेत.

























































