
देशामध्ये मोठ्या घडामोडी घडताहेत, घडवल्या जाताहेत असे म्हणत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईत आज (13 जुलै) मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी माध्यमांना माहिती दिली. ही पत्रकार परिषद महत्त्वाच्या विषयावर असणार असल्याचे म्हणत त्यांनी, सरकार निष्क्रीय आहे निर्घृण आहे, तसेच देशामध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत, घडवल्या जात आहेत याच विषयावर पक्षप्रमुखांनी बोलावं अशी आमची भूमिका आहे असे यावेळी म्हटले.
येत्या 18 जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. परंतु अद्याप या आंदोलनाला मंदिर न्यासाने परवानगी दिली नाही. या संदर्भात बोलताना राऊत म्हणाले, हे कुठलेही राजकीय आंदोलन आहे.. हे रामाचे मालक कधीपासून झाले? असा प्रश्न यावेळी राऊतांनी उपस्थित केला. हे केवळ राम मंदिराविषयी नाही तर कुठल्याही मंदिराविषयी म्हणतोय आम्ही रामरक्षा म्हणणार आहोत.. आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत.. आता यासाठी परवानगी घ्यावी लागत असेल तर, मग हे हिंदुत्वाचे मालक आहेत का? असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस न्यासाचे अध्यक्ष आजीवन सदस्य आहेत. तर आम्ही रामाचे आजीवन भक्त आहोत. त्यामुळे मला वाटत नाही कुठल्याही प्रकारे वाद निर्माण होईल.
नागपुरात अनेक राममंदिरे आहेत. अशा प्रकारच्या धार्मिक संस्था आहेत. आम्हाला फक्त लोकांमध्ये जागरूकता आणायची आहे. या देशामध्ये रामाच्या नावावर काय चालले आहे. याला खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला पाहिजे. ते न्यासाचे आजीवन सदस्य आहेत. ते कार सेवेला गेले आहेत. तेच राममंदिर लुटले जात असेल तर देवेंद्र फडणवीसांसह सगळ्या पुढाऱ्यांनी भक्तांनी आमच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावं. म्हणूनच मी देवेंद्र फडणवीसांनी रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देतोय, असे यावेळी राऊत म्हणाले.
रामरक्षा आंदोलनासाठी कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेने राम मंदिरासाठी केलेले आंदोलन चाललं ना. हिंदुहद्यसम्राट यांनी राम मंदिरासाठी आंदोलन केले ते तुम्हाला चाललं का? तेव्हा का नाही तुम्ही आक्षेप घेतला? असा प्रश्न यावेळी राऊतांनी उपस्थित केला. राम मंदिर बाबरीचे घुमट कोसळत असताना ज्यांनी काखा वर केल्या ते राम मंदिर न्यासाचे सदस्य होतात काय.. आणि आम्ही कोर्टाच्या खटल्यांना सामोरे गेलो, तेव्हा तुम्ही आम्हाला विरोध करताय.. हा कोणता न्याय? याला न्याय म्हणत नाही.. हा न्याय आम्हाला मान्य नाही.. हे रावणाचे राज्य नाही.. रामराज्य आहे म्हणताय ना असे म्हणत राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. यावर अधिक बोलताना राऊत म्हणाले, मुंबईतील दंगलीत सर्व ताकदीनिशी आम्ही उभे होतो, दंगलीत आमचे लोक मरण पावले. बाॅम्बस्फोटात आमचे लोक मरण पावलेत. आम्ही कडवट हिंदुत्ववादी आहोत.. रामरक्षा आंदोलनाला परवानगी न देऊन या निमित्ताने तुम्ही एक्सपोज होताय असे यावेळी राऊत म्हणाले.
मोदींनी पंतप्रधानपदाच्या कालावधीबाबत नेहरूंचा विक्रम होता तो मोडला.. या संदर्भात प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, कसले विक्रम कोण मोडतंय मला कळत नाही असे ताशेरे त्यांनी केंद्रावर ओढले. राऊत याबद्दल बोलताना म्हणाले, पंडित नेहरूंच्या कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा विक्रम कोणी मोडू शकणार आहे का? पंडित नेहरूंनी देश घडवला, देश शून्यातून उभा केला. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशामध्ये सुई बनत नव्हती.. सुईचा धागा बनत नव्हता. नेहरूंनी देश घडवला.. नेहरूंचे दिवस होते ते क्वालिटी वर्क होते. तसंच महाराष्ट्रामध्ये वसंत राव नाईकांनी हरितक्रांती आणली. वसंत दादा पाटलांनी सहकार क्षेत्रात काम केलं.. शरद पवारांनी महिला आरक्षण असो.. एमआयडीसी तसेच राज्यात गुंतवणूक आणण्याचा विषय असेल.. अनेक प्रकल्प राबवून त्यांनी मुंबई महाराष्ट्राला शेतकऱ्यांना ताकद दिली असे म्हणत राऊतांनी केंद्रासह राज्यातील धोरणांवर नाराजी व्यक्त केली.
यासंदर्भात अधिक बोलताना राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस असं काही काम ठामपणे सांगु शकतील का? लाडकी बहिण योजना आणली ही फक्त मतं विकत घ्यायला आणली… आमच्या कार्यक्रमात नितीन चंदनशिवे म्हणाले, देवेंद्रच देवाभाऊ करायला 1500 रुपये वाटावे लागले त्यातही 92 लाख बोगस लाभार्थी होते. या 92 लाख लाभार्थ्यांना पैसे दिले त्याची वसुली कुणी करायची? असा प्रश्न यावेळी राऊतांनी उपस्थित केला. राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, त्यावेळचं संपूर्ण कॅबिनेट यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून, 92 लाख बोगस लाभार्थींना वाटलेली रक्कम ही कोट्यवधींची आहे ती वसूल केली पाहिजे. महिला बालकल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हांच्या मुख्यमंत्र्यांसह ज्यांनी याला मंजूरी दिली अशा सर्वांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणे गरजेचे आहे असे यावेळी राऊत म्हणाले.
लाडकी बहिण योजनेबद्दल भविष्यात अनेक कारणे देतील. या योजनेवर कॅगचे ताशेरे आहेत. मग यावर कुणीतरी कोर्टात जाईल.. मग कोर्ट त्याला स्थगिती देईल.. या माध्यमातून ती योजना भविष्यात बंद केली जाईल. दिड हजारचे 2 हजार हे आश्वासन देण्यात आलं होतं. मग का पूर्ण केलं नाही हे आश्वासन असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारने अजूनही धडपणे केली नसल्याचे म्हणत राऊतांनी सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. तसेच 1500 चे 2100 करावे ना अडवलंय कुणी असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारचा तिखट शब्दांमध्ये समाचार घेतला.

























































