मध्य पूर्वेतील तणाव वाढला, हिंदुस्थानात इंधन आणि गॅसचे दर पुन्हा वाढणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणखी तीव्र झाल्यास हिंदुस्थानच्या ऊर्जा सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा ज्येष्ठ ऊर्जा अर्थतज्ज्ञ किरीट एस. पारेख यांनी दिला आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे हिंदुस्थानचा कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू आयातीवरील खर्च वाढण्याची शक्यता आहे. तसेच इंधन पुरवठा विस्कळीत होऊन होर्मुझच्या सामुद्रधुनीत कार्यरत हिंदुस्थानी खलाशांसमोरही नवीन धोके निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

एनडीटीव्हीशी बोलताना पारेख म्हणाले की, “मध्य पूर्वेतील युद्ध आणखी भडकले, तर हिंदुस्थानासाठी तेल आणि नैसर्गिक वायू आयात करणे अधिक महाग होईल.” त्यामुळे देशाच्या ऊर्जा आयातीवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, असे त्यांनी सांगितले.

अमेरिका आणि इराणमधील ताज्या हल्ल्यांनंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीभोवती पुन्हा एकदा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगातील सर्वाधिक वर्दळीच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या या सामुद्रधुनीतून जागतिक स्तरावरील मोठ्या प्रमाणातील कच्चे तेल आणि LNG ची वाहतूक केली जाते.

गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानाने कच्च्या तेलाच्या आयातीसाठी विविध देशांकडून पुरवठा घेण्याची रणनीती अवलंबली असली, तरी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजीच्या आयातीसाठी देश अजूनही आखाती देशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी हिंदुस्थानसाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

या तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय तेल बाजारावरही दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्सची किंमत प्रति बॅरल 80 अमेरिकन डॉलरच्या जवळ पोहोचली होती. मध्य पूर्वेतील वाढत्या अनिश्चिततेमुळे सोमवारी व्यवहारादरम्यान ब्रेंट क्रूडच्या किमतीत 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास हिंदुस्थानच्या इंधन आयात खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम महागाई, वाहतूक खर्च आणि अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो.