
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि जागतिक तेल पुरवठ्याबाबत एक मोठे विधान केले आहे. अमेरिकेने आता होर्मुझच्या सामुद्रधुनीची सुरक्षा आपल्या हाती घेतली असून, या संरक्षणाच्या बदल्यात अमेरिकेला जगाकडून योग्य तो आर्थिक मोबदला मिळायला हवा, अशी थेट मागणी ट्रम्प यांनी केली आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट करताना इराणवरही जोरदार शब्दांत निशाणा साधला. ते म्हणाले की, अमेरिका या अत्यंत महत्त्वाच्या सामुद्रधुनीचे नियंत्रण करत असून आता आम्हीच या मार्गाचे रक्षणकर्ते बनणार आहोत. या सुरक्षेसाठी अमेरिकेला पैसे मिळायला हवेत. आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार आणि तेल पुरवठ्यात आम्ही कोणताही अडथळा येऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
अमेरिकेचे इराणसोबत नुकतेच एका करारावर एकमत झाले होते आणि इराणने अनेक गोष्टींवर तडजोड करण्याची तयारीही दाखवली होती. मात्र बैठक संपल्यानंतर अवघ्या काही तासांतच इराणने एका जहाजावर ड्रोन हल्ला करून हा करार मोडल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.
दरम्यान, पश्चिम आशियातील होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक अर्थव्यवस्थेचा आणि ऊर्जा सुरक्षेचा एक अत्यंत संवेदनशील आणि कळीचा मार्ग आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के हिस्सा याच सागरी मार्गावरून जातो. सध्या या सागरी मार्गावरील नियंत्रणावरून अमेरिका आणि इराणमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. इराणने हा मार्ग बंद केल्याचा दावा केला होता. मात्र अमेरिकन लष्कराने आणि ट्रम्प यांनी हा मार्ग व्यावसायिक वाहतुकीसाठी खुला असल्याचे म्हटले आहे.



























































