
नागालँडमधील सुखोवीपरिसराजवळ आसाम रायफल्सच्या वाहनांवर आयईडी स्फोट घडवून आणल्याची मोठी घटना समोर आली आहे. या भ्याड हल्ल्यात एक जावं शहीद झाला असून, इतर ४ जवान जखमी झाले आहेत. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आसाम रायफल्सच्या जवानांची वाहने सुखोवी परिसराजवळून जात असताना त्यांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. रस्त्यात पेरून ठेवलेल्या आयईडीद्वारे हा स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटाची तीव्रता मोठी होती. यात एका जवानाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर या स्फोटात जखमी झालेल्या इतर ४ जवानांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून वरिष्ठ लष्करी आणि पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.



























































