
सध्याच्या घडीला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेऊन आयटी कंपनी HCLTech ने AI डेटा सेंटर व्यवसायात मोठी झेप घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या क्षेत्रात सुमारे 3 हजार 500 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा कंपनीने गेल्या तीन महिन्यांत 3, 300 हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
कंपनीच्या आकडेवारीनुसार, मार्च 2026 अखेर HCLTech मध्ये 2,27,181 कर्मचारी होते. मात्र जूनअखेर ही संख्या 2, 23, 889 इतकी झाली असून, एकूण 3, 292 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. HCLTech चे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. विजयकुमार यांनी सांगितले की, सरकारी आणि व्यावसायिक क्षेत्रात AI व क्लाउड सेवांचा वापर वेगाने वाढत आहे. त्यामुळे डेटा सेंटर्सची मागणीही वाढत असून, त्यासाठी कंपनी मोठी गुंतवणूक करत आहे.
यापूर्वी HCLTech ने हिंदुस्थानी AI स्टार्टअप सर्वम AI मध्ये 150 दशलक्ष डॉलर्स गुंतवले आहेत. तसेच, कंपनीने अंतर्गत वापरासाठी OpenAI सोबत भागीदारी करून ChatGPT एंटरप्राइज स्विकारले आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे. सी. विजयकुमार म्हणाले, “AI मुळे संगणकीय क्षेत्राचे अर्थशास्त्र पूर्णपणे बदलले आहे. डेटा सेंटर्स, GPU, AI मॉडेल्स आणि एंटरप्राइझ ॲप्लिकेशन्स यांचा समावेश असलेली संपूर्ण AI परिसंस्था उभारण्यावर आमचा भर आहे. हा HCLTech च्या भविष्यातील वाढीचा महत्त्वाचा मार्ग ठरेल.”
कंपनीने सांगितले की, AI डेटा सेंटर प्रकल्पासाठी संभाव्य ग्राहकांशी चर्चा सुरू असून, एका ग्राहकासोबत करार अंतिम टप्प्यात आहे. AI च्या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे हिंदुस्थानी आयटी उद्योगात रोजगाराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, कंपन्या पारंपरिक सेवांऐवजी AI-आधारित तंत्रज्ञानावर अधिक भर देत आहेत. त्यामुळे HCLTech,TCS आणि इतर आयटी कंपन्या AI मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून भविष्यातील वाढीची दिशा निश्चित करत आहेत.





























































