लाडकी बहीण योजनेतून 92 लाख लोकांना दीड हजार वाटून 3515 कोटी रुपयांचा अपहार केला, संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंमत असेल तर आमिर खानच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याच ठराव कॅबिनेट मध्ये मांडावा असे आव्हान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिले. तसेच लाडकी बहीण योजनेतून 92 लाख लोकांना दीड हजार वाटून 3515 कोटी रुपयांचा अपहार केला, असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत. बाकी शिंदे गट आणि अजित पवार गट हे अमित शहांचे पक्ष आहेत. शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीतला पक्ष आहे. शरद पवार हे आमच्या महाविकास आघाडीतले अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातल्या घडामोडीवर आमचं लक्ष असणं हे सहाजिक आहे. काही दिवसांपूर्वी माझे सुप्रिया सुळे यांच्यासोबत बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की ज्या काही बातम्या समोर येत आहेत त्या अफवा आहेत. सगळेच पक्ष आता अडचणीतून प्रवास करत आहेत. एखाद्या पक्षाकडे प्रचंड बहुमत आहे याचा अर्थ तो पक्ष अडचणीत नाही असे नाही. शरद पवार यांच्या पक्षातल्या अडचणी दूर करायला ते समर्थ आहेत. बाह्यशक्तींकडून अडचणी निर्माण केल्या जात आहेत. ही बाह्यशक्ती मोदी शहांची आहे. प्रादेशिक पक्षात स्थैर्य यावं, नीट काम व्हावं, विरोधी पक्षांनी नीट भूमिका बजावावी असं त्यांना वाटत नाही.

जयंत पाटील हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांच्या भुमिकेत काम करणारे नेते आहेत. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचही पगडा आहे. सांगली हा क्रांतिकारक आणि चळवळींचा मोठा भाग आहे. जयंतराव त्या मुशीतूनच तयार झाले आहेत. जातीय आणि धर्मांध शक्तींसोबत जयंतराव जातील हे त्यांच्या शत्रूंनाही वाटणार नाही. जयंतराव यांची काम करण्याची क्षमता उच्च आहे. शरद पवार यांच्या पक्षातील बहुतांश आमदार हे शाहु फुले आंबेडकर विचारांचे आहेत.

लाडकी बहीण योजनेबाबत संजय राऊत म्हणाले की, 14 हजार कोटी रुपये लाडकी बहीण योजनेतून वितरित करण्याची बाब समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत जे 92 लाख बोगस लाभार्थी आहेत, कोणतीही केवायसी न करता, कोणतीही छाननी न करता, त्यात 29 हजार पुरुष आहेत. 4500 सरकारी कर्मचारी आहेत. असे 3 हजार 515 कोटी रुपये अशा पद्धतीने उधळले गेले. फडणवीस आणि मिंध्यांनी मतं विकत घेण्यासाठी सरकारी पैश्यांचा हा अपहार झाला. राम मंदिरातील दान पेटीतील पैसे चोरणे आणि सरकारी तिजोरी लुटणं हा गुन्हा सारखाच आहे. अशा वेळी 3515 कोटी रुपयांची वसूली कशी करणार हा मोठा प्रश्न आहे. एका बँकेत पाच हजार रुपयांचा घोटाळा झाला तर त्या कर्मचाऱ्याला पोलीस अटक करतात. विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यावर बँकेच्या पैश्यांचा अपहार केल्याचा ठपका आहे. म्हणून त्यांच्यावर रेड कॉर्नर नोटीस, ईडी, सीबीआय नोटीस पाठवून त्यांच्या संपत्ती जप्त केल्या आहेत. 3515 कोटी रुपये मंत विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीतले वापरले हा शतकातला सर्वात मोठा अपहार आहे. ज्या 92 लाख लाभार्थ्यांना ज्यांच्या सहीने पैसे मिळाले, तेव्हाचे एकनाथ शिंदे कॅबिनेटवर सरकारी पैश्यांचा अपहाराचा गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि संपूर्ण कॅबिनेट, तेव्हाचे अर्थखात्याचे, महिला व बालकल्याण खात्याचे सचिव यांची व्यक्तीगत संपत्ती जप्त करून ही वसूली व्हायला हवी असे आमचे मत आहे. हा पैसै पचवू देता कामा नये. याला परदेशी भाषेत गैरमार्गाने राज्य ताब्यात घेणे म्हणतात. अशा प्रकारचे गुन्हे रशिया, दक्षिण आफ्रिकेत आणि युगांडात झालेले आहेत. यावर कारवाई होणे गरजेचे आहे. आम्ही स्वतः सरकारला एक नोटीस पाठवत आहोत. वेळ पडली तर कोर्टातही जाऊ. कारण हा गुन्हा दुर्मिळातला दुर्मिळ आहे. 92 लाख लोकांना दीड हजार वाटून 3515 कोटी रुपयांचा अपहार करता, तुमच्या बापाचे पैसे आहेत का? शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, विद्यार्थ्यांसाठी योजना नाही, आश्रमशाळेसाठी निधी मिळत नाही. कुणीही गप्प बसले तरी मी गप्प बसणार नाही.

आमच्या आंदोलनाला भाजप जर प्रत्युत्तर देत असेल तर याचा अर्थ ते लुटीचं समर्थन करत आहेत. आम्ही रामाची भक्ती करत आहोत. राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावर आम्ही बोलत आहोत. त्यावर जर तुम्ही प्रत्युत्तर आंदोलन करत असाल तर तुम्ही मुर्ख आहात. खरंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी यांचे बौद्धिक घेतले पाहिजे. आम्ही नागपूरला चाललो आहोत आम्ही त्यांना विनंती करू. या चोरीविरुद्ध संघाने खेद आणि खंत व्यक्त केली आहे. ही लूट समाजाला कलंकित करणारी आहे असं म्हटलंय. जे लोक प्रत्युत्तर देत आहेत ते बनावट संघवाले आणि हिंदुत्ववादी आहेत. हे लोक आमिर खानच्या सिनेमांवर बहिष्कार टाकत आहेत. हिंमत असेल तर कॅबिनेटमध्ये ठराव मांडावा आणि मंजूर करावा. जर एखादा असा मंत्री म्हणत असेल तर ती सरकारची भूमिका आहे.

कोणत्याही मंदिरात राजकीय आंदोलन होऊ नये हे धार्मिक क्षेत्र आहे. मुंबईत आम्ही मंदिरात नव्हे तर मंदिराच्या बाहेर आंदोलन केले. भाजपने मंदिराचे राजकारण केले. भाजपसाठी अयोध्येच्या राम मंदिराचा विषय राजकारणाचा झाला. नागपूरमध्ये मी आज जाणार आहे आणि चार दिवस मुक्काम असणार आहे. अंबादास दानवे, सूरज चव्हाण हे नेतेही तिथे येत आहेत. पाच सहा मंदिरांची आम्ही पाहणी करू आणि ठरवू. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे, असेही संजय राऊत म्हणाले.