
पाच नागरिकांच्या रहदारीसाठी महत्त्वाचा असलेला जव्हार तालुक्यातील दाभेरी-सागपाणी मार्ग गेल्या वर्षी पावसाळ्यात वाहून गेला होता. येथे भलेमोठे भगदाद पडले असल्याने सहा गावांतील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना पर्यायी मार्गाने ये-जा करावी लागत आहे. तर काही जण तारेवरची कसरत करत याच नादुरुस्त मार्गाने प्रवास करत आहेत. मात्र बांधकाम विभाग दुरुस्तीच करत नसल्याने संताप व्यक्त होत असून अधिकारी कामात आहेत की झोपेत, असा सवाल केला जात आहे.
जव्हार तालुक्यातील दाभेरी-सागपाणी मार्गावर सागपाणी, डाहूळ, पाचबुड, रिठीपाडा, वावर, बेहेडपाडा गावातील शालेय विद्यार्थी, शेतकरी, कामगार, रुग्ण आणि व्यापाऱ्यांची ये-जा होत असते. रस्ता खचल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असून त्यासाठी अधिक वेळ आणि अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, सागपाणी बस सेवा बंद झाल्याने दुर्गम भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
“दाभेरी-सागपाणी रस्त्यावरील भगदाडाच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून मंजुरी मिळताच तातडीने काम सुरू करण्यात येईल. दरम्यान नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी आणि सागपाणी बस सेवा पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने तात्पुरत्या उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.”
श्रीपाद शिंदे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार
“‘दाभेरी-सागपाणी रस्त्याला पडलेल्या भगदाडाला आता एक वर्ष पूर्ण झाले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कायमस्वरूपी दुरुस्ती केलेली नाही. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि कामगारांना बसत आहे. बस सेवा बंद असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा.”
रमेश जनाठे, सागपाणी ग्रामस्थ





























































