
दापोली तालुक्यातील मळे गावात ४ जुलै ते १२ जुलै या दरम्यानच्या कालावधीत तब्बल ९ दिवस विद्युत पुरवठा खंडित होता. त्यानंतर सततच्या पाठपुराव्यामुळे आणि ग्रामस्थांनी केलेल्या मदतीमुळे नऊ दिवसानंतर विज पुरवठा पूर्ववत करण्यात आला मात्र सुरू करण्यात आलेला विद्युत पुरवठा सतत खंडीत होण्याची मालिका पुन्हा सुरू झाल्याने अनियमित विदयुत पुरवठ्याच्या या प्रकाराला कंटाळलेले मळे येथील ग्रामस्थांनी अखेर दापोली येथील विदयुत महावितरण कंपनीचे कार्यालयावर धडक दिली. याचे नेतृत्व शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी केले. यावेळी गुजर यांनी जालगाव विभागाचे असिस्टंट इंजिनिअर वैभव सिंग यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना निरुत्तर केले. पुढील दोन दिवसांत विदयुत पुरवठा सुरळीत आणि विना खंडीत सुरू झाला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल. आंदोलना दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला विद्युत महावितरणच जबाबदार असेल असा थेट इशाराच त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी शिवसेना दापोली शहर प्रमुख आणि नगरसेवक संदीप चव्हाण , शिवसेना शहर समन्वयक प्रदिप गमरे या शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मळे येथील शशिकांत फिलसे, संतोष फिलसे, अजय फिलसे , संदेश गोसावी, प्रवीण पांदे , विनोद पांदे , अजय बोवने , प्रितेश तेलप तसेच आगरवायंगणी येथील विक्रम पवार हे उपस्थित होते.
दापोली तालुक्यातील मळे येथे ४ जुलै ते १२ जुलै या दरम्यानच्या कालावधीत ९ दिवस विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित होता. येथील ग्रामस्थांनी विद्युत महावितरणकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे खंडीत विद्युत पुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यात आला मात्र तो नव्याची नवलाईच ठरला. कारण दुसऱ्या दिवसापासूनच पुन्हा विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला. ही परिस्थिती लक्षात घेवून बुधवारी येथील ग्रामस्थांनी दापोली येथील विदयुत महावितरण कंपनीचे कार्यालय गाठले . यावेळी शिवसेना दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी त्यांना मोलाची साथ देत त्यांची ती समस्या आपली समजून खंडीत तसेच अनियमित विदयुत पुरवठ्याबाबत जालगाव सेक्शन अधिकारी वैभव सिंग यांना मळे तसेच मळे परिसरात भेडसावणाऱ्या विद्युत समस्यांची आपबिती कथन करत प्रश्नांचा भडीमार करुन भंडावून सोडले.
मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या विजेच्या सततच्या खंडीत प्रकाराबाबत बोलताना ग्रामस्थांनी मळे येथे सुरू असलेल्या विद्युत पुरवठा सप्लाय हा दाभोळ मधुन व्हाया पंचनदी – दुमदेव वरुन सुरू आहे. ही विदयुत लाईन सतत फॉल्टी असते ती विद्युत पुरवठा लाईन बंद असेल तेव्हा मळे येथे उंबर्ले कडून येणा-या विद्युत लाइनचा सप्लाय सुरू करून देण्याची आग्रही मागणी केली . तसेच मळे गावात वारेबुबा येथे असलेल्या 100 kV ट्रान्सफॉर्मरचा एकुणच लोड पाहता येथे 200 kV चा नव्याने ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा अशी मागणी केली. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत मळे, आगरवायंगणी , केळील , सातेरे , कळकी आणि चिखलगाव या ६ गावांसाठी एकच वायरमन सदया कार्यरत आहे. या परिसराची एकुणच व्याप्ती आणि एकमेकांचे गावापासुनचे अंतर पाहता तसेच जंगलातून गेलेल्या विद्युत लाईन लक्षात घेऊन येथे नवीन वायरमनची भरती होईपर्यंत या विभागात मागील 3 वर्षापासुन कॉन्ट्रॅक्टबेसिकवर काम करणाऱ्या इसमास पुन्हा कार्यरत केल्यास येथील समस्या सुटण्यास मदत होईल अशा मागणीने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यातील ट्रान्सफॉर्मरची मागणी विद्युत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तत्वतः मान्य केली आहे तर आपल्या परिसरातील एखादा आयटीआय झालेला कोणी असेल तर त्यांना सध्याला आपल्या येथे ठेवण्यात येईल असे सांगतानाच आयटीआय झालेला त्या परिसरात राहणारा कोणी तरी तंत्रज्ञ सुचवा त्याची तेथे भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नेमणूक केली जाईल असे सांगितले. एकुणच विजेची मागणी आणि तेथील परिस्थितीची सांगड घालून आपल्या रास्त समस्या सोडविण्यासाठी पुर्णपणे सहकार्य केले जाईल असे शिवसेना तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर यांच्या नेतृत्वाखाली विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयात आलेल्या उपस्थितांना आश्वस्त केल्याने ग्रामस्थांची विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयावरील धडकचे फलित यशस्वी झाले.































































