
‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शिवसेना पाठिंबा देणार असल्याची चर्चा पूर्णपणे चुकीची आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक येणार की नाही हेच अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे या चर्चेला अर्थ नाही,’ असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज स्पष्ट केले.
राम मंदिरातील लुटीविरोधात 18 जुलै रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नागपूरमध्ये आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबद्दल हल्ली जाणीवपूर्वक काही बातम्या पसरवल्या जात आहेत. भाजप आणि शिंदे गटाला काहीही काम राहिलेले नाही. त्यामुळे अफवा पसरवून मूळ प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. ‘मागील अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयकाच्या संदर्भात सरकारसोबत याबाबत चर्चा झाली होती. त्या बैठकीला आमचे अरविंद सावंत, सुप्रिया सुळे इतरही काही नेते उपस्थित होते. आताच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक येणार असल्यास त्यावर आम्ही सर्व विरोधक बसून सामूहिक निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि कायदा त्यांना हटकत नाही. इतकेच नव्हे, तर ते हा चोरीचा माल घेऊन देशाच्या गृहमंत्र्यांकडे जातात आणि त्याला सोन्याचा मुलामा देण्याची मागणी करतात. गृहमंत्रीही त्याला मान्यता देत असतील, तर देशातील कायद्याविषयी मला चिंता वाटते.






























































