कोल्हापूर विमानतळावरील ड्रग्जतस्करी चव्हाट्यावर! ‘दिल्ली कनेक्शन’ समोर; तिघांना अटक, एकाचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, नागपूरसारख्या काही आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील ड्रग्जतस्करीचे लोण कोल्हापूर विमानतळावरही आल्याचे समोर आले आहे. कोल्हापुरातून दिल्लीला जाणाऱ्या एका प्रवाशाने विमानतळाची सुरक्षा भेदताना स्वच्छतागृहातील कचरापेटीत ७० ग्रॅम चरस टाकून पळ काढला. हा चरस मित्राच्या साहाय्याने एका सफाई कर्मचाऱ्याच्या मदतीने बाहेर काढला. पण, या दोघांनी चरस परस्पर विकण्याचा प्रयत्न केल्याने, हा धक्कादायक प्रकार समोर आला.

चरस तस्करीचे हे कनेक्शन दिल्लीपर्यंत पोहोचले असून, दिल्लीतील त्या आकाश सैरावत नावाच्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी बिपीनकुमार सूर्यभान सैरावत (३४, रा. द्वारका, दिल्ली), त्याचा मित्र मयूर गणेश माने (४०, रा. सम्राटनगर) आणि विमानतळावरील कंत्राटी बेल्ट ऑपरेटर ओंकार मिठारी (रा. मणेरमळा, उचगाव, ता. करवीर) या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीतील रहिवासी आकाश सैरावत काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात आला होता. शनिवारी दिल्लीला जाण्यासाठी ७० ग्रॅम चरस घेऊन तो कोल्हापूर विमानतळावर आला होता; पण विमानतळाच्या आत प्रवेश करताना सुरक्षा व्यवस्थेचा अंदाज घेत, कारवाईच्या भीतीने त्याने चरस स्वच्छतागृहातील एका कचरापेटीत टाकले. काही वेळाने कोल्हापुरात सम्राटनगरमध्ये राहणाऱ्या बिपीनकुमार या मित्राला याची माहिती दिली. बिपीनकुमारने त्याचा मित्र मयूर मानेशी संपर्क करून विमानतळावर कंत्राटी बेल्ट ऑपरेटर ओंकार मिठारी याला चरस बाहेर आणण्याची जबाबदारी दिली. यासाठी मिठारीला सात हजार रुपयांचे आमिष दाखवले.

चरस बाहेर आणल्यानंतर बिपीनकुमार आणि आकाश यांच्याशी कोणताही संपर्क न करता, ओंकार मिठारी आणि मयूर माने यांनी हा ७० हजारांचा चरस परस्पर विकण्याचे ठरवले; पण विक्रीच्या तयारीत असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गांधीनगर पोलिसांनी या दोघांना पकडले. त्यामुळे या ड्रग्स तस्करीचा प्रकार समोर आला. या प्रकरणाच्या दिल्ली कनेक्शनचा तपास पोलीस करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कुस्तीसाठी येणाऱ्या तरुणांची पडताळणी करणार

‘कुस्तीपंढरी’ म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी देशभरातून विशेषतः हरियाणा, नवी दिल्ली, उत्तर प्रदेशमधील तरुण येत असतात. आतापर्यंत नशेसाठी गांजाचे प्रमाण वाढल्याने पोलिसांकडून गांजा विक्री करणाऱ्या आणि घेणाऱ्यावर कारवाईचा धडाका सुरू आहे. आता गंभीर गुन्ह्यांमध्ये परराज्यातील तरुणांची नावे समोर येत असल्यामुळे शहरातील तालमींमध्ये येणाऱ्या तरुणांची पडताळणी करणार असल्याचेही पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.