FIFA World Cup 2026 Final – मेस्सीनं कडेवर घेतलं, आंघोळ घातली तोच मुलगा आता फायनलमध्ये अर्जेंटिनाला आव्हान देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नियतीचा चक्र किती अजब असते, याचे जगातील सर्वात जिवंत उदाहरण म्हणजे फिफा विश्वचषक 2026 चा अंतिम सामना! या लढतीत मेस्सीने 19 वर्षांपूर्वी ज्या मुलाला कडेवर घेतले, आंघोळ घातली तोच मुलगा आता अर्जेंटिनापुढे आव्हान म्हणून उभा राहणार आहे. या अजब योगायोगाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.

न्यू जर्सीतील मेटलाईफ स्टेडियमवर रविवारी अर्जेंटिना आणि स्पेनचे एकमेकांविरुद्ध जेतेपदासाठी मैदानात उतरतील. अर्जेंटिनाचा संघ गतविजेता असून स्पेनचा संघ 16 वर्षानंतर अंतिम फेरीत पोहोचला आहे. अर्जेंटिना विजेतेपद राखण्यासाठी, तर स्पेन पुन्हा एकदा जेतेपद उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या लढतीत अर्जेंटिनाचा महानायक आणि यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजुला स्पेनचा तरुण स्ट्रायकर लॅमिन यामाल हा अर्जेंटिनापुढे ढाल बनून उभा राहणार आहे. हा तोच यामाल आहे ज्याला मेस्सीने 2007 मध्ये एका चॅरिटी फोटोशूटवेळी अंगाखांद्यावर खेळवले होते.

बॉलीवूडलाही गाजवेल अशी स्टोरी

डिसेंबर 2007 सालची गोष्ट. बार्सिलोना परिसरातील एका चॅरिटी फोटोशूटसाठी अवघ्या 5 महिन्यांच्या यामालला घेऊन त्याची आई कॅम्प नोऊ स्टेडियमवर पोहोचली होती. तिथे भेट झाली ती 20 वर्षांच्या तरुण मेस्सीची. छायाचित्रकार जोआन मॉनफोर्ट यांनी टिपलेल्या त्या फोटोंमध्ये मेस्सी अतिशय लाजाळू स्वभावाने एका प्लास्टिकच्या टबमध्ये लहानग्या यामालला आंघोळ घालताना दिसत आहे. कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती की, ज्या बाळाला मेस्सीने आपल्या कडेवर घेतले होते, प्रेमाने आंघोळ घातली होती तेच भविष्यात त्याच्या संघापुढे आव्हान म्हणून उभे राहील.

महानायकांचा महामुकाबला

युरो कप गाजवल्यानंतर लॅमिन यामालने विश्वचषकातही स्पेनला फायनलपर्यंत पोहचवण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. दुसरीकडे, 39 वर्षांचा मेस्सी आजही आपल्या जादुई खेळाच्या जोरावर अर्जेंटिनाचा रथ ओढत आहे. उपांत्य फेरीत स्पेनने फ्रान्सला 2-0 ने धूळ चारली, तर अर्जेंटिनाने इंग्लंडवर 2-1 ने विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरी गाठली.

FIFA World Cup 2026 – शेवटच्या 7 मिनिटात गेम फिरला; इंग्लंडचे स्वप्नभंग करत अर्जेंटिना अंतिम फेरीत, जेतेपदासाठी स्पेनशी सामना

वारसदार विरुद्ध बादशहा

आजवर बॅलन डी’ओरसाठी नामांकित झालेला सर्वात तरुण खेळाडू म्हणून यामालने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मेस्सीसाठी हा कदाचित त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आणि सर्वात भावनिक सामना असेल. तर यामालसाठी आपल्या आयडॉलविरुद्ध खेळून स्वतःला सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

यामाल नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज

कॅम्प नोऊच्या एका छोट्या बाथटबपासून सुरू झालेला हा प्रवास आता न्यू जर्सीच्या अवाढव्य स्टेडियमवर पोहोचला आहे. 19 वर्षांपूर्वी ज्या मेस्सीने यामालला कडेवर घेतले होते, आता तोच यामाल मैदानात मेस्सीच्या अर्जेंटिनासमोर ढाल बनून उभा ठाकणार आहे. फुटबॉल विश्वात मेस्सीचं युग संपणार की यामाल नवा इतिहास रचणार? याचे उत्तर रविवारी अवघं जग डोळे विस्फारून पाहणार आहे!