
पती चार दिवस कामावर न गेल्याने जोडप्याने वाद झाला. पाहता पाहता वाद विकोपाला गेला. संतापलेल्या पतीने आधी कुत्र्याच्या पट्ट्याने गळा आवळून पत्नीची हत्या केली. मग स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली. स्वप्ना असे पत्नीचे तर मनोज असे पतीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बंगळुरूच्या चन्नमनाकेरे अचुकट्टू भागात गुरुवारी ही घटना घडली. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील असून मनोजचा जन्म आणि पालनपोषण बंगळुरूमध्येच झाले होते आणि तो सुतारकाम (कारपेंटर) करत असे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले होते. मनोज गेल्या चार दिवसांपासून कामावर गेला नव्हता आणि पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. या वादादरम्यान, मनोजने नायलॉनच्या पट्ट्याने स्वप्नाचा गळा आवळला. पत्नीची हत्या केल्यानंतर, मनोजने त्याच नायलॉनच्या पट्ट्याचा वापर करून खोलीतील सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



























































