
ओडिशातील पुरी येथे प्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेला गुरुवारी सुरवात झाली. या यात्रेला भाविकांची गर्दी उसळली होती. यादरम्यान रथयात्रेत चेंगराचेंगरी झाली. यात एका भाविकाचा मृत्यू झाला तर जवळपास 100 भाविक जखमी झाले आहेत. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने मृत भाविकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जखमींना रुग्णवाहिकेने पुरी जिल्हा मुख्यालय रुग्णालय आणि इतर वैद्यकीय केंद्रांमध्ये नेण्यात आले.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, भाविक भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे रथ पाहण्यासाठी आणि ते ओढण्यासाठी बडा दंडा (भव्य रस्ता) वर थांबले होते. अचानक, प्रचंड गर्दीमुळे धक्काबुक्की सुरू झाली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. अनेक भाविक खाली पडले, ज्यामुळे एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर लगेचच पोलीस, ओडिशा आपत्कालीन जलद कृती दल (ODRAF) आणि आरोग्य विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली.
प्रशासनाने परिस्थिती त्वरीत नियंत्रणात आणल्याचा आणि जमावाला नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केल्याचा दावा केला आहे. तथापि, जखमींची अधिकृत संख्या किंवा घटनेच्या कारणाबाबत प्रशासनाने अद्याप सविस्तर निवेदन जारी केलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.





























































