
अश्लील फोटो काढून बदनामीची धमकी देत पैसे व सोन्याचे दागिने उकळणाऱ्या एका ब्लॅकमेलर टोळीचा जालन्यातील चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात स्वतःला ‘रिलस्टार’ म्हणून ओळख निर्माण केलेली एक महिला, पत्रकार आणि वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणासह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ३ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जालना शहरातील नवीन मोंढा परिसरातील ४५ वर्षीय व्यक्तीची महिला आरोपीशी ओळख झाली होती. घर दाखविण्याच्या बहाण्याने तिने संबंधित व्यक्तीला आपल्या घरी बोलावले. तेथे तिच्या साथीदारांनी तक्रारदाराला मारहाण करून त्याचे अश्लील फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी ७५ हजार रुपये रोख आणि सुमारे दोन तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या खंडणी म्हणून उकळल्या. तसेच त्याच्या वाहनाचेही नुकसान करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू व अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपास सुरू केला. नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे १४ जुलै रोजी मुख्य महिला आरोपी शुभांगी हिवाळे हिला मंठा रोड परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत महिलेने आपल्या साथीदारांची नावे उघड केल्यानंतर पोलिसांनी राम राजू पाटोळे (आर.आर.) आणि अनिकेत प्रशांत कसबे यांना अटक केली. तपासात राम पाटोळे हा पत्रकार असून, अनिकेत कसबे हा वकिलीचे शिक्षण घेत असल्याचे निष्पन्न झाले.
सोन्याच्या अंगठ्या, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन, दोन दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार २ जून २०२६ रोजी घडला होता. मात्र, बदनामीच्या भीतीने तक्रारदाराने तक्रार दाखल केली नव्हती. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारच्या गुन्ह्यात दुसऱ्या टोळीवर कारवाई झाल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर तक्रारदाराने धैर्य दाखवत तक्रार नोंदवली आणि या ब्लॅकमेलर टोळीचा पर्दाफाश झाला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर, कृष्णा तंगे, राजू पवार, अभिजित वायकोस, नवनाथ पाटील, सागर खैरे, ज्योती राजपूत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सागर बावस्कर यांच्या































































