
राज्यात 70 हजारांहून अधिक पदांसाठी भरती लवकरच करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला पाच महिने उलटले असून अद्याप एकही नवीन पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. त्यातच आता ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने 70 हजार पदांची सरळ सेवा भरती बारगळण्याची शक्यता दिसत आहे. 70 हजारांपैकी 20 हजार पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, याचाही त्यांना विसर पडल्याने ही भरती कधी होईल, तसेच ऑनलाइन परीक्षेला स्थगिती मिळाल्याने उमेदवाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात फेब्रुवारी महिन्यात बैठक झाली. या वेळी फडणवीस यांनी 70 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याचे सांगितले होते. राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवाव्यात याव्यात, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेला प्राधान्य असेल, असे स्पष्ट केले होते. भरती प्रक्रियेबाबत युवकांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात, असेही फडणवीस यांनी सांगितले होते.
सरळ सेवा भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या भरतीसाठी दहा लाखांहून अधिक उमेदवार अर्ज करतात. इतक्या उमेदवारांची महाराष्ट्रात एकाच वेळी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणे अशक्य आहे. त्यामुळे आयोगाने ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडला होता. मात्र ऑनलाईन परीक्षेला स्थगिती देण्यात आल्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या उमेदवारांची सरळ सेवा भरती घेणे अशक्य आहे. त्यामुळे तूर्तास एमपीएससीमार्फत सरळ सेवा भरती होण्याची शक्यता धूसर झाली.



























































