
कांदिवलीतील मशिदीवरील भोंग्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. मशिदीच्या 90 मी परिसरात प्रसूतीगृह असून भोंग्यामुळे होणाऱ्या आवाजाचा नुकत्याच जन्मलेल्या बाळांवर किती गंभीर परिणाम होत असेल याची तुम्हाला जरा तरी कल्पना आहे का? असे खडसावत न्यायालयाने याप्रकरणी सरकारवर ताशेरे ओढले. इतकेच नव्हे तर सदर परिसर शांतता क्षेत्र घोषित करण्याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश खंडपीठाने सरकारला दिले.
कांदिवलीच्या ठापूर व्हिलेज येथे राहणाऱ्या अॅड रीना रिचर्ड यांनी पहाटे मशिदीतून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणासंदर्भात समता नगर पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रार नोंदवली. मात्र त्याची दखल घेतली न गेल्याने त्यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज शुक्रवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांनी खंडपीठाला सांगितले की, हायकोर्टाच्या अन्य खंडपीठाने शाळा, रुग्णालयापासून 100 मी परिसर शांतता क्षेत्र घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ठापूर व्हिलेजमध्ये प्रसूतिगृह असतानाही अद्याप सदर विभाग शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला नाही. सह पोलीस आयुक्तांनी याबाबत दिलेल्या उत्तरात हा परिसर शांतता क्षेत्रात येत नसल्याचे नमूद केले याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले. याप्रकरणी दोन आठवड्यांनी सुनावणी होईल.



























































