
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाचे नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत असताना पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी सुनेत्रा पवार यांना लिहिलेल्या पत्रात पक्षातील काही वरिष्ठ नेते पार्थ पवार यांचे राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अजितदादा गटाचे उदयकुमार आहेर यांनी १३ जुलै रोजी सुनेत्रा पवार यांना लिहिलेले पत्र आज सार्वत्रिक झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पार्थ पवार यांना जाणीवपूर्वक दुय्यम स्थान देण्यात आले. त्यांचे मनोबल खच्ची करण्याचे काम
करण्यात आले. त्यांचे राजकीय करिअर संपवण्यासाठी काहीजण नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांची क्षमता सिद्ध करण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात यावी, अशी मागणी आहेर यांनी पत्रात केली आहे.
पार्थ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्या पाठोपाठ पार्थ पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. सध्या अजित पवार गटात अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.




























































